मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. परिणामी रेल्वे प्रवाशांची संख्या घटली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक मार्गांवरील रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी ते पुणे मार्गावर धावणारी डेक्कन क्वीन, सीएसएमटी ते मनमाड पंचवटी, सीएसएमटी ते जालना जनशताब्दी विशेष गाड्या 25 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
या गाड्या होणार सुरू
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 02123 सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन विशेष 25 जूनपासून आणि गाडी क्रमांक 02124 पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन विशेष 26 जूनपासून पुढील सुचना मिळेपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. या गाड्यांची संरचना 4 वातानुकूलित चेअर कार, 10 द्वितीय आसन श्रेणी, 2 गार्ड ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसन श्रेणी, एक पेंट्री कार अशी असणार आहे. गाडी क्रमांक 02109 सीएसएमटी-मनमाड पंचवटी विशेष 26 जूनपासून आणि गाडी क्रमांक 02110 मनमाड-सीएसएमटी विशेष 25 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 02271 सीएसएमटी-जालना जनशताब्दी विशेष 25 जून आणि गाडी क्रमांक 02272 जालना-सीएसएमटी जनशताब्दी विशेष 26 जूनपासून पुढील सुचना मिळेपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.