मुंबई- एकीकडे कोरोना सर्वत्र थैमान घालत आहे. याची भीती सर्वत्र आहे. दुसरीकडे मध्यरात्रीपासून मुंबई शहरात पडणाऱ्या पावसामुळे शहरात रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत काही भागात लोकांच्या घरातही मोठ्याप्रमाणात पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरोनाची भीती असताना मुंबईत पावसामुळे झोपडपट्टीमधील घरात पाणी साचल्याने नागरिक त्रस्त आहेत.
मुंबईकरांचे हाल; मुंबईच्या प्रवेशद्वार असलेल्या परिसरातील वस्तींमध्ये पाणीच पाणी . . . . आज झालेल्या जोरदार पावसानंतर मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या कुलाबा, गीतानगर परिसरातील वस्तीत पावसाळी वाहिन्या, नाले तुंबून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पावसाळी वाहिन्या, नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने आणि पालिकेने काहीच व्यवस्थापन न केल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून शहराच्या ठिकठिकाणी पावसाळी वाहिन्या, नाले तुंबण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात आज झालेल्या पावसाचा फटका कुलाबा परिसरातील गीतानगर परिसरातील अनेक घरांना बसला. या परिसरातील अनेक घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. साधारण या नगरात 300 खोल्या या समुद्रकिनारी आहेत. यातील काही घरांमध्ये अक्षरशः गुडघ्याइतके पाणी भरले होते.
आधीच कोरोनामुळे लोकं आहेत त्रस्त. . .
मुंबईत पावसामुळे सर्वत्र पाणी भरते. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली दिसते. अनेकांच्या घरात घुसलेले पाणी उपसावे लागले. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली जाते. मुंबईचा प्रवेशद्वार म्हणवल्या जाणाऱ्या कुलाबा परिसर हे सर्वांच्या दृष्टीने चांगले ठेवायला हवे. पण दरवर्षी आहे, तीच परिस्थिती दुसऱ्याच पावसात ओढवली आहे. आमचे पुढे कसे व्हायचे, एकतर कोरोनामुळे भीती त्यात, या भागात पालिकेने नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित केली नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी कौशिक आणि यास्मिन यांनी केला आहे. आजच्या पावसात मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या कुलाबा भागाची ही परिस्थिती पाहून सर्वानाच याची चिंता वाटली आहे.