मुंबई - सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मशीद स्थानकादरम्यान रुळावर पाणी साचल्याने उपनगरीय वाहतूक सेवा रद्द करण्यात आली. परिणामी दुपारी सीएसएमटीवरून कर्जत लोकल मशीद स्थानकात थांबल्याने प्रवासी रेल्वेत अडकले.
अत्यावश्यक सेवेतील प्रवासी लोकलमध्ये अडकले
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसला आहे.
दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी सीएसएमटीवरून कर्जत लोकल रवाना झाली. ती काही मिनिटांत मशीद स्थानकादरम्यान थांबली. खाली उतरणार तर रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यात अनेकदा प्रवाशांनी रेल्वेच्या 182 नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. सलग 2 तास प्रवासी रेल्वेत अडकून पडले होते. अखेर काहींचा रेल्वेच्या आरपीएफशी संपर्क झाला. त्यानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ट्रेनमधून एक एक प्रवाशांना खाली उतरवत हात धरून कंबर भर पाण्यातून पुन्हा सीएसएमटी स्थानकात आणले. रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वेच्या साफ़सफाई आणि पावसाळ्याच्या तयारीचा बोजवारा उडाला आहे.