महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कारागृहातील कैद्यांच्या लसीकरणावर भर द्या - हायकोर्ट

कारागृहातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याचे आदेश कोर्टाच्या सुनावणीत देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये चालु वर्षीच्या मार्च-एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल केली होती.

कारागृहातील कैद्यांच्या लसीकरणावर भर द्या - हायकोर्ट
कारागृहातील कैद्यांच्या लसीकरणावर भर द्या - हायकोर्ट

By

Published : Apr 21, 2021, 7:43 AM IST

Updated : Apr 21, 2021, 8:24 AM IST

मुंबई : राज्यातील विविध कारागृहांमध्ये होत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारागृहातील कैद्यांच्या लसीकरणावर भर द्यावा अशा सूचना मुंबई हायकोर्टाने केल्या आहेत. कैद्यांना जेल अधिकाऱ्यांच्या वावरामुळे कोरोना होत असल्याचे निरीक्षणही हायकोर्टाने नोंदविले आहे.

22 एप्रिलला पुढील सुनावणी

कारागृहातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याचे आदेश कोर्टाच्या सुनावणीत देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये चालु वर्षीच्या मार्च-एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल केली होती. राज्यातील तुरूंगांत कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, किंवा प्रस्तावित उपाययोजनांविषयी कोर्टाने 20 एप्रिलपर्यंत राज्य सरकारला भूमिका मांडण्यास सांगितले होते. विशेष म्हणजे काही वृत्तपत्रांनी दिलेल्या 16 एप्रिलच्या वृत्तानुसार ह्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेतली. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाकडून 22 एप्रिल रोजी पुढील सुनावणी घेतली जाणार आहे.

कारागृहांमध्येही कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव

महाराष्ट्रात सध्या कोरोना प्रचंड वेगाने पसरतोय. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा वेग कितीतरी पटीने जास्त असल्याचं दिसत आहे. दररोज रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाबाबत सध्या राज्यात फारच गंभीर परिस्थिती असल्याने लॉकडाउनसदृश कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आता राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा शिरकाव झाल्याचे चित्र आहे. कारागृहातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 200 वर पोहोचली आहे. 13 मार्च 2021 ला राज्यातील कारागृहांमध्ये केवळ 42 कोरोना सक्रिय रुग्ण होते. पण दुसर्‍या लाटेदरम्यान हे संक्रमण झपाट्याने पसरल्यामुळे या आकड्याने काही दिवसांतच भयावह द्विशतक गाठले आहे. राज्यातील 44 तुरुंगात आतापर्यंत तुरूंग प्राधिकरणाकडून 57 हजार 524 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एप्रिल 2020 पासून एकूण 3 हजार 113 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Apr 21, 2021, 8:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details