मुंबई -कोरोना काळात स्वयंसेवकांनी देशभरात सेवाभारतीच्या माध्यमातून ९२ हजार ६५६ ठिकाणी सेवाकार्य केले. याकरता ५ लाख ६० हजार कार्यकर्ते सक्रिय होते. या कार्यादरम्यान ७३ लाख जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, साडेचार कोटी लोकांना भोजन पॅकेटचे वितरण करण्यात आले, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.
'कोरोना काळात अभूतपूर्व मदत'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १९ व २० मार्च 2021 या काळात बंगळुरू येथे संपन्न झाली. त्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मोढ म्हणाले की, कोरोनामुळे मार्च ते जून महिन्यापर्यंत संघाच्या शाखा बंद होत्या. जुलैपासून हळूहळू शाखा सुरु झाल्या. तत्पूर्वी साधारण २२ मार्चपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या क्षमतेने कोरोना मदतकार्यात उतरले होते. तसेच ९० लाख मास्कचे वितरण, २० लाख प्रवाशांची मदत करण्यात आली. २ लाख ५० हजार भटके-विमुक्त समाजातील लोकांना मदत करण्यात आली. ६० हजार युनिट रक्तदान करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोरोनामुळे शाखांच्या संख्येत घट
गेल्या वर्षी कोरोना संक्रमणाच्या प्रकोपामुळे प्रतिनिधी सभा स्थगित करण्यात आली होती. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात ३८९१३ स्थानी ६२४७७ शाखा, २०३०१ साप्ताहिक मीलने आणि ८७३४ संघमंडळी असे संघाचे कार्य सुरू होते. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात ३४५६९ स्थानी ५५६५२ शाखा, १८५५३ साप्ताहिक मिलने आणि ७६५५ संघमंडळी अशी संघाची संख्यात्मक कार्यस्थिती होती असे त्यांनी सांगितले. मागील वर्षी जगात सर्वच कार्य ठप्प झाले होते. संघ ही त्याला अपवाद नव्हता. त्यामुळे संघाच्या शाखांच्या संख्येत काही प्रमाणात घट दिसून आली, पण दुसरीकडे संघकार्यकर्ते मात्र झोकून देऊन सेवाकार्यात जुंपले होते. शाखा आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असून, लवकरच त्यांच्या संख्येत वाढ दिसून येईल असे डॉ. सतीश मोढ यांनी यावेळी सांगितले.
कोरोना काळात रा. स्व. संघाकडून ७२ लाख जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भव्य मंदिर निर्मितीसाठी मदत
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ठरावामध्ये श्रीराम जन्मभूमीवर मंदिर निर्माण हा भारताच्या आंतरिक शक्तीचा आविष्कार असल्याचे म्हटले असून, एक राष्ट्र आणि एक समाज म्हणून एकजुटीने केलेल्या कोरोना महामारीच्या मुकाबल्याबद्दल भारतीय जनतेचे अभिनंदन करण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या पवित्र दिनी भारताचे प्रथम नागरिक महामहिम राष्ट्रपति यांच्याकडून झालेले निधि समर्पण आणि दिल्लीनील भगवान वाल्मीकि मदिरापासून सुरू झालेले ४४ दिवसांचे अभियान जागतिक इतिहासातील सर्वात मोठे सपर्क अभियान सिद्ध झाले आहे, जवळपास साडेपाच लाखाहून अधिक नगरे व गावातील १२ कोटीहून अधिक रामभक्त कुटुबांनी भव्य राम मंदिर निर्मितीसाठी आपले समर्पण दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.