महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत मागील दहा वर्षात एकही 'एन्काउंटर' नाही... वाचा सविस्तर इतिहास

मुंबईत कधी झाला होता पहिला व शेवटचा एन्काउंटर, महाराष्ट्रातील संशायस्पद एन्काउंटर कोणते, कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला झाली संशयास्पद एन्काउंटरनंतर शिक्षा वाचा सविस्तर बातमी...

mumbai police and encounter
मुंबई पोलीस आणि 'एन्काऊंटर'..

By

Published : Jul 10, 2020, 3:46 PM IST

Updated : Jul 11, 2020, 5:41 AM IST

मुंबई- उत्तर प्रदेश पोलिसांनी कानपूर येथील कुख्यात गुंड विकास दुबे याचा एन्काउंटर केल्यानंतर आता बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा सुरु झाली आहे. तब्बल ८ पोलिसांचा जीव घेणाऱ्या व ६० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गँगस्टर विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलीस न्यायालयात हजार करण्यासाठी कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात विकास दुबेचा एन्काउंटर पोलिसांनी केला.

समशेर पठाण, माजी पोलीस अधिकारी

एक काळ असा होता, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात डाऊद इब्राहिम, अरुण गवळी, छोटा राजन, अश्विन नाईक सारख्या अंडरवर्ल्ड टोळ्या ह्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या होत्या. खून, खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी, खंडणी व टोळी युद्धामुळे मुंबई शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मुंबई पोलिसांनी याविरोधात कारवाई करत शेकडो गुंडांचे एन्काउंटर केले होते. यात एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रदीप शर्मा (312 एन्काउंटर), दया नायक (83 एन्काउंटर), प्रफुल्ल भोसले (77 एन्काउंटर), रवींद्रनाथ आंग्रे (54 एन्काउंटर), सचिन वाजे (63 एन्काउंटर) , विजय साळसकर (61 एन्काउंटर) यांनी मुंबईतील टोळ्यांचे कंबरडे मोडले होते. मात्र, यातील काही बनावट एन्काउंटर प्रकरणी प्रदिप शर्मा, दया नायक, सचिन वाजे व प्रफुल्ल भोसले ह्या अधिकाऱ्यांना तुरुंगवास भोगावा लागला आहे.

  • मुंबई शहरातील पहला एन्काउंटर

मुंबईत 80च्या दशकात गँगवॉर सुरु झाले होते. मुंबईत पोलिसांच्या रेकॉर्डनुसार पहिला एन्काउंटर हा मन्या सुर्वे या गुंडाचा करण्यात आला होता. मुंबई पोलीस खात्यातील तत्कालीन पोलीस अधिकारी रवींद्र तांबट व इसाक बागवान या दोघांनी वडाळा परिसरात मन्या सुर्वेचा चकमकीत खात्मा केला होता. पाहिल्या एन्काउंटरनंतर मुंबई पोलिसांनी शहरातील टोळ्यांचे कंबरडे मोडीत जवळपास बाराशे गुंडाना चकमकीत यमसदनी पाठवले आहे.

  • मुंबई शहरातील शेवटचा एन्काउंटर

मुंबईत शेवटचा एन्काउंटर हा 2009 मध्ये करण्यात आला. यानंतर अद्याप कुठलाही एन्काउंटर मुंबई पोलिसांनी केलेला नाही.

मुंबई पोलिसांनी आजपर्यंत जेवढे एन्काउंटर केले त्यापैकी काही जणांचे एन्काउंटर हे संशयास्पद वाटल्यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

  • मुंबईतील संशयास्पद एन्काउंटर अन् कारवाई झालेले पोलीस अधिकारी

1997 जावेद फावडा एन्काउंटर

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या टोळीत काम करणारा जावेद फावडा ह्याचा एन्काउंटर 1997 साली करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी केलेला हा एन्काउंटर बनावट असून ज्याचा एन्काउंटर करण्यात आला होता तो बांद्रा रेल्वे स्टेशन बाहेर चणे- शेंगदाणे विकणारी व्यक्ती असल्याचा आरोप पीडिताच्या कुटुंबीयांनी केला होता. केवळ नावात साधर्म्य आढळल्याने चुकीच्या व्यक्तीला उचलून पोलिसांनी बलार्ड पियर येथे ठार मारल्याचा आरोप करत काही मानव अधिकार संघटना व पीडिताच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, या प्रकरणी झालेल्या सुनावणीत पोलिसांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला होता. ज्यास सर्वोच्य न्यायलयात आव्हान देण्यात आले होते.

2006 लखन भैया एन्काउंटर

नोव्हेंबर, 2006 साली छोटा राजन टोळीसाठी काम करणारा रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया ह्याचा मुंबई पोलीस खात्यातील प्रदीप शर्मा ह्या पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली अंधेरी डि एन नगर येथे एन्काउंटर करण्यात आला होता. लखन भैयाचा भाऊ अॅड. राम प्रकाश गुप्ता यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात अॅड. राम प्रकाश गुप्तांनी लखन भैयाचा एन्काउंटर नसून मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी थंड डोक्याने केलेली हत्या असल्याचा आरोप केला होता. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशीसाठी नेमण्यात आली होती. ज्यात प्रदीप शर्मा, डि एन नगरचे पोलीस निरिक्षक प्रदीप सूर्यवंशी यांसह १७ पोलिसांना खुनाच्या आरोपात अटक करण्यात आली होती.

ख्वाजा युन्नूस एन्काउंटर

2002 घाटकोपर बॉम्ब ब्लास्टमधील मुख्य आरोपी ख्वाजा युन्नूस यास अटक केल्यानंतर रात्रीच्या वेळी त्यास चौकशीसाठी औरंगाबाद येथे पोलीस वाहनाने नेण्यात येत होते. त्यावेळी वाटेत अचानक पोलीस वाहनाचा अपघात झाला होता. ज्यात ख्वाजा युन्नूस हा पळून गेल्याचे पोलीस रेकॉर्डवर दाखविणायत आले होते. मात्र, कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या ख्वाजा युन्नूसच्या हत्येच्या आरोपानंतर याप्रकरणी प्रफुल्ल भोसले व सचिन वाजे या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

  • चार तास चाललेला एन्काउंटर

लोखंडवाला शूट आउट

16 नोव्हेंबर, 1991 साली अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील स्वाती इमारतीच्या 'ए विंग'मध्ये माया डोळस व त्याचे 7 साथीदार असल्याचे मुंबई पोलिसांच्या दशहतवादी विरोधी पथकाला (एटीएस) कळाले. पोलिसांनी त्या इमारतीला घेरून माया डोळस यास शरण येण्याचे आव्हान केले होते. मात्र, माया डोळस याच्याकडून पोलिसांवर गोळीबार सुरू झाल्यानंतर पोलिसांनी सुद्धा प्रत्युत्तरात गोळीबार केला होता. जवळ पास 4 तास चाललेल्या या एन्काउंटरमध्ये मुंबई पोलिसांचे 48 पोलीस जखमी झाले होते तर माया डोळस, त्याचा साथीदार दिलीप बुवासह 7 जण या पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले.

  • एन्काउंटर फेम, माजी पोलीस अधिकारी समशेर पठाण याचे दुबे एन्काउंटरबाबतचे मत

मुंबई पोलीस खात्यातील माजी सहायक पोलीस उपायुक्त व एन्काउंटर फेम समशेर पठाण यांच्यानते विकास दुबे व ख्वाजा युन्नूस या दोघांच्याही एन्काउंटरमध्ये पोलीस वाहनाला अपघात झाला, असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ख्वाजा युन्नूस हा उच्च शिक्षित तरुण होता. पण, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती तर विकास दुबे हा सराईत गँगस्टर म्हणून कुप्रसिद्ध होता. पोलिसांना शरण जाऊनही चकमकीत विकास दुबे मारला जाणे हे खूपच संशयापसद असून वरिष्ठ पातळीवरून आलेल्या दबावावरून हा एन्काउंटर झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. यात पुढे जाऊन चौकशी ही होऊन यात शामिल असलेले बरेच अधिकारी समोर येतील, असे समशेर पठाण यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा -मंत्र्यालाही पोलीस ठाण्यात घुसून मारणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेचा इतिहास...

हेही वाचा -गुंड विकास दुबेला ठार केलं जाऊ शकतं... चकमकीच्या काही तास आधी सर्वोच्च न्यायालयात याचिका

Last Updated : Jul 11, 2020, 5:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details