मुंबई -रशिया, मॉस्कोतील रुडमिनो मागरिटा फॉरेन लँग्वेज स्टडी या संस्थेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा हा पुतळा मॉस्कोच्या शासकीय वाचनालयात लावला जाणार आहे.
अण्णाभाऊ साठे वंचितांचा आवाज: या प्रसंगी बोलताना अण्णाभाऊ साठेंचा आम्हाला अभिमान असल्याचे गौरवोद्गगार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वंचितांचे आवाज असलेले अण्णाभाऊ साठे यांचे भारतीय स्वतंत्रता संग्राम व गोव्याच्या मुक्ती संग्रामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. रशियाने त्यांचा गौरव केल्याने आम्हाला अभिमान वाटत आहे. शिवाय, मला या लोकार्पण सोहळ्याची संधी दिली याबद्दल आभारी आहे.
संयुक्त महाराष्ट्रासाठी योगदान: ज्या कालखंडात भारतीय समाज जातिव्यवस्थेने बरबटलेला होता. त्या काळात दलित समजल्या जाणाऱ्या मातंग कुटुंबात १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. सर्व भावंडांत ते वडीलभाऊ असल्यामुळे त्यांची भावंडे त्यांना अण्णाभाऊ म्हणू लागले. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी
महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
महाराष्ट्रासाठी गौरवाचा विषय :लंडनमधील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जपानमधील विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अशा कार्यक्रमांसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे त्या-त्या देशांमध्ये गेले होते. आता अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक रशियात झाले असल्याने महाराष्ट्रासाठी हा मोठा गौरवाचा विषय आहे.
रशियन क्रांतीचा प्रभाव :साठे यांच्या लेखनावर रशियन क्रांतीचा मोठा प्रभाव होता. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता आणि रशियातील लेनिनच्या नेतृत्वाखालील कामगार क्रांतीमुळे ते भारावून गेले. त्यांच्या साहित्यकृतींमध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा, रशियाचा माझा प्रवास आणि अनेक कथा आणि कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या आहेत.