मुंबई -नौटंकी थांबवा आणि मुंबईत जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करा असा सल्ला भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत काल मोठी घट दिसून आली. दोन महिन्यांनंतर नवीन रुग्णांचा आकडा 3876 पर्यंत खाली आला. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर हे लॉकडाऊनचे यश असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याच मुद्यावरून आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न
'महापालिका आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी हे लॉकडाऊनचे यश असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात टेस्टिंग कमी करण्यात आल्याने रुग्ण संख्येत घट झाली आहे. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे कोविडमधून आपण सावरतोय, या आंनदात आपण आहोत. आपण कोणाला मूर्ख बनवतोय? हा सर्व प्रतिमा संवर्धानाचा प्रकार आहे. मानवी जीवाचे त्यांना काही पडले नाही.'' अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.