मुंबईच्या लालबाग गणेशगल्ली परिसरातील साराभाई इमारतीला आग; १६ रहिवासी जखमी
09:20 December 06
मुंबईच्या लालबाग गणेशगल्ली परिसरात सिलिंडरचा स्फोट..
मुंबई -लालबाग गणेशगल्ली येथील साराभाई इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने 16 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी 12 जणांवर केईएम तर 4 जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
लालाबाग गणेश गल्ली येथे सुप्रसिद्ध अशी पाचमजली साराभाई इमारत आहे. याच विभागात मुंबईमधील सुप्रसिद्ध असा गणेशगल्ली गणेशोत्सव साजरा केला जातो. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी 7 वाजून 23 मिनिटांनी आग लागली. आगीच्या घटनेत इमारतीमधील 16 रहिवासी भाजले आहेत.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन 7 वाजून 50 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये भाजलेल्या 16 जणांपैकी 12 जणांवर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 4 जणांना ग्लोबल हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.