मुंबई : तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या समुद्री हद्दीतून उत्तरेकडे सरकत आहे. आज सायंकाळपर्यंत ते गुजरातच्या हद्दीत दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या वादळामुळे राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली. या पावसामुळे राज्यात एकूण सात जणांचा बळी गेला आहे.
वादळामुळे झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन बहिणींचा मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील अंचलवाडी येथील घटना..
जळगाव - वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे घडली. ज्योती बल्लू बारेला (वय १६) आणि रोशनी बल्लू बारेला (वय १०) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत.
ज्योती आणि रोशनी यांचे वडील बल्लू बारेला हे अमळनेर तालुक्यातील रणाईचे गावातील रहिवासी राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदारकी करतात. बल्लू यांनी राहण्यासाठी अंचलवाडी गावाबाहेर खळ्यात चिंचेच्या झाडाजवळ झोपडी बांधलेली होती. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. याचवेळी काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड झोपडीवर कोसळले. त्यात ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना घडली तेव्हा बारेला दाम्पत्य हे दररोजप्रमाणे शेतात कामाला गेलेले होते. ज्योती आणि तिची लहान बहीण रोशनी घरी होत्या. चिंचेचे झाड झोपडीवर कोसळल्याने दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण झोपडी दबली जाऊन झोपडीतील सामानाचे नुकसान झाले आहे.
गोव्यात दोघांचा मृत्यू, चार जण जखमी..
पणजी (गोवा) - चक्रीवादळामुळे गोवा राज्यात अनेक ठीकाणी मागच्या 24 तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा देखील बंद पडली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी मोठी मदत करत राज्यात ठिकठिकाणी पडलेली झाडे बाजूला केली आहेत. अजूनही मदतकार्य सुरु आहे. दरम्यान पावसाची रिपरिप अजूनही काही प्रमाणात सुरूच आहे.
मजलावाडा-हणजुणे येथील शीतल महादेव पाटील (३४) या अविवाहित तरुणीचा अंगावर माड पडून मृत्यू झाला. तर दुचाकीवरून पालसरेहून माशेलला जात असलेल्या किशोर उर्फ केशव जगन्नाथ नाईक (४७) व श्याम नाईक यांच्या अंगावर विजेचा खांब कोसळला. त्यात किशोर नाईक यांचे इस्पितळात नेताना निधन झाले. तर श्याम नाईक गंभीर जखमी असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. याशिवाय सकाळी वास्को येथे घरावर झाड पडून त्यातील तिघेजण गंभीर जखमी झाले. तर, उंडीर-फोंडा येथील जयराम नाईक यांच्यावर झाड कोसळल्यानेही तेही जखमी झाले आहेत. सर्वच जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रायगडच्या उरणमध्ये दोन ठार..
रायगड : तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार प्रभाव हा पाहायला मिळत आहे. रात्री दोन वाजल्यापासून जिल्ह्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या वादळात उरण बाजारपेठेत भिंत कोळसून एक महिला जागीच ठार झाली आहे. नीता रमेश नाईक (रा. अवेडा) असे मयत महिलेचे नाव आहे. जिल्ह्यात अजून दोन जण जखमी झाले असून एका जनावरांचा मृत्यू झाला आहे. एकूण 8,399 घराचे नुकसान झाले आहे.
तौक्ते चक्रीवादळ हे रात्री अडीच वाजल्यापासून रायगडच्या समुद्रात दाखल झाले. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वादळी वारा वाहत आहेत. ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने हे वारे वाहत असून वादळ मुंबईकडे सरकले असले तरी त्याचा प्रभाव अजूनही रायगडात सुरू आहे. तअनेक भागात झाडे कोसळून 8399 घराचे नुकसान झाले आहे. पावसामुळे सखल भागात पाणीही साचले आहे.
सिंधुदुर्गात चक्रीवादळामुळे एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता, दोन बोटी बुडाल्या..
सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गच्या किनाऱ्याला मोठा फटका बसला आहे. देवगडच्या आनंदवाडी बंदरात नांगरून ठेवलेल्या आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या अपघातात एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता झाले आहे. तीन खलाशांची या घटनेत प्राण वाचले आहेत. किनारी भागात झाडे कोसळल्याने खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान देवगड येथील घटनेतल्या बेपत्ता खलाशांसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. Body:एका खलाशांचा मृत्यू, तिघे बेपत्ता, तिघे बचावले
तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, रा. गढीताम्हणे, ता. देवगड या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी रा. पावस, रत्नागिरी, नंदकुमार नार्वेकर रा. कोल्हापूर, प्रकाश गिरीद, रा. राजापूर, रत्नागिरी हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर, रा.रत्नागिरी, विलास सुरेश राघव, रा. पुरळ - कळंबई, ता. देवगड, सूर्यकांत सायाजी सावंत, रा. हुंबरठ, ता. कणकवली हे सुखरूप बाहेर आले आहेत.
स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे. तसेच या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी बचावलेल्या खलांशांची भेट घेतली. सदरचे खलाशी हे मौजे पालये येथील सागर करंगुटकर यांच्या घरी सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.