मुंबई- आरे कॉलनी येथे एमएमआरडीए मार्फत होणाऱ्या मेट्रो भवन व सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत ८९ हजार घरे बांधण्याच्या टेंडरमधील महाघोटाळा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उघडकीस आणला होता. या घोटाळ्याच्या कागदपत्रांसहित सावंत यांनी शुक्रवारी पंतप्रधान कार्यालयाकडे अधिकृत तक्रार केली आहे.
मेट्रो भवनसह प्रधानमंत्री आवास योजना टेंडर घोटाळ्याची पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल
मेट्रो भवन व सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजने मार्फत ८९ हजार घरे बांधण्याच्या टेंडरमधील महाघोटाळा प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाबरोबरच प्रधान लेखापरीक्षक मुंबई क्र. १ आणि ३, कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय दक्षता आयोगाकडे याची तक्रार करण्यात आली आहे.
या टेंडर घोटाळ्यामध्ये विशिष्ट कंत्राटदारांना जाणीवपूर्वक निविदेमधील अटी व शर्ती बदलून तसेच नव्याने तयार करून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीची मागणी काँग्रेस पक्षातर्फे केली गेली होती. आरे कॉलनीतील झाडे तोडून होणाऱ्या प्रकल्पाला मुंबईकरांचा प्रचंड विरोध आहे. असे असतानाही सरकारतर्फे हा प्रकल्प रेटण्यात येत आहे. अशात यामध्ये भ्रष्टाचार होणे हे मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असे सावंत म्हणाले.
मेट्रोभवन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याकरिता स्वतः पंतप्रधान येणार आहेत. त्यामुळे या तक्रारीला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. मेट्रो भवनबरोबरच पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असल्याने पंतप्रधान कार्यालयाने या घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाबरोबरच प्रधान लेखापरीक्षक मुंबई क्र. १ आणि ३, कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय दक्षता आयोगाकडे याची तक्रार करण्यात आली आहे.