महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 12, 2021, 1:18 AM IST

ETV Bharat / city

'सर्व यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी करावी'

पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी यांना तर त्यानंतर दुसऱ्या गटातील पोलिस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदीं फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल. राज्यभर लस वाटपाची प्रक्रिया, त्याची वाहतूक तसेच लस योग्य त्या तापमानात ठेवली जाईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत आहे. ही मोहीम महाराष्ट्रात यशस्वीरीत्या राबवावी. सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीत लस उपलब्धता, वाहतूक, साठवणूक व प्रत्यक्ष लस देणे यासंदर्भात तयारीविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात माहिती दिली.

हेही वाचा-लसीकरणाची तयारी पूर्ण, कोणती लस द्यायची या विषयी संभ्रम

समन्वयातून ही मोहीम यशस्वी करावी -
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात होत आहे. राज्यातदेखील त्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयातून ही मोहीम यशस्वी करावी. पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी यांना तर त्यानंतर दुसऱ्या गटातील पोलिस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदीं फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल. राज्यभर लस वाटपाची प्रक्रिया, त्याची वाहतूक तसेच लस योग्य त्या तापमानात ठेवली जाईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लसीकरण मोहीम सुरू झाल्यावरही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. याची नोंद घेतानाच लसीकरणांनतरही कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा-राज्यभर ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्रायरन यशस्वी - राजेश टोपे

अफवांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष दक्षता -
दरम्यान, आज झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतात अत्यावश्यक वापरासाठी परवानगी देण्यात आलेल्या दोन लसींची निर्मिती देशातच झाल्याचा अभिमान आहे. या दोन्ही लसी जगातील अन्य लसींपेक्षा किफायतशीर आहेत. देशभरात पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट आणि दोनमधील सुमारे ३ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना केंद्र सरकारमार्फत लस पुरविली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील आणि विकार असलेल्या ५० वर्षांच्या आतील नागरिकांना लसीकरण केले जाईल. लसीकरणाबाबतच्या अफवांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले.

यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात ११४ ठिकाणी ड्राय रन यशस्वी-

महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details