मुंबई -केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ३ लाख ५ हजार कोटींची तरतूद केली आहे. रस्ते, सिंचन, रेल्वे मार्ग, मेट्रो अशा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्याला अर्थसंकल्पात कमी निधी मिळाल्याचा प्रचार करीत आहे, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, माजी मंत्री संजय भेगडे हे या प्रसंगी उपस्थित होते.
हेही वाचा -मोबाईल अभावी मुलीने आत्महत्या केल्याचा मुद्दा खासदार श्रीनिवास पाटलांनी मांडला लोकसभेत
अर्थसंकल्पात इतकी तरतूद -
केंद्रीय अर्थसंकल्पात आणि रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा फडणवीस यांनी विस्ताराने आढावा घेतला. ते म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पाचा नीट अभ्यास न करताच या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही, अशा पद्धतीचा प्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चालू केला आहे. राज्यातील रस्ते, रेल्वे, सिंचन, मेट्रो या पायाभूत क्षेत्रांसाठी तसेच अन्य प्रकल्पांसाठी मंजूर झालेले प्रकल्प व मंजूर प्रकल्पांसाठी झालेल्या तरतुदी पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला 3 लाख 5 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्यातील 10 हजार किलोमीटर लांबीच्या 328 रस्ते प्रकल्पांसाठी 1 लाख 33 हजार 255 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यासाठी 2 हजार किलोमीटर लांबीचे 16 नवे रेल्वे मार्ग मंजूर झाले आहेत. जलशक्ती मंत्रालयाकडून राज्यासाठी 4 हजार कोटींची तरतूद केली गेली आहे.