मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे देशात लसीकरण सुरू आहे. मात्र या लसीकरण मोहीमेतही काही लोकांना पैसा दिसू लागला होता. यामुळे या लसीकरणात काळाबाजार सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील बोगस लसीकरणानंतर उघड झाले होते. या प्रकरणातील कारवाई सुरू आहे. या बोगल लसीकरणात सहभागी असलेल्या शिवम हॉस्पिटलला टाळे ठोकण्यात आले आहे. महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली असून रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द करण्यात येणार आहे.
ग्लुकोजचे पाणी मिसळून लसीकरण..
या प्रकरणात मुंबईत ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून शुक्रवारी पोलिसांनी कोकिलाबेन रुग्णालयातील बडतर्फ मार्केटिंग प्रमुख राजेश पांडे आणि राहुल दुबे या दोघांना अटक केली. या दोघांच्या अटकेमुळे बोगस लसीकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या १३वर पोहोचली आहे. या टोळीने मुंबईत दहा ठिकाणी लसीकरण शिबीर घेतले होते. बोरिवली, कांदिवली, खार, वर्सोवा, बांगुरनगर, भोईवाडा, आंबोली, समतानगर आणि ठाणे येथे प्रत्येकी एक गुन्हा नोंदविण्यात आला. जवळपास ३ हजारपेक्षा अधिक लोकांना या टोळीने ग्लुकोजचे पाणी मिसळून ती कोव्हिशिल्डच्या नावाने खपवली. १०५५ जणांना कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची लस दिली होती.