मुंबई - प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मुंबई बँकेचे (Mumbai Bank) अध्यक्ष असतानाच्या काळात २ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. सहकार विभागाने केलेल्या चौकशीत हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत. यामुळे दरेकर यांची आमदारकी रद्द करावी तसेच त्यांन्हा विरोधी पक्षनेते पदावरून काढावे. दरेकर यांना पाठीशी घालणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही नैतिकता म्हणून आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केली आहे.
भाई जगताप - मुंबई काँग्रेस अध्यक्ष दरेकर, फडणवीस, पाटील यांचा राजीनामा घ्या -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात अध्यक्ष भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भाई जगताप बोलत होते. यावेळी बोलताना, राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे २०१३ ते २०२० या कार्यकाळात मुंबई बँकेचे अध्यक्ष होते. दरेकर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मुंबई बँकेत तब्बल २ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची चौकशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सहकार विभागाने केली. त्यावेळी सहकार विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील होते.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी प्रकरण दाबले -
सहकार विभागाच्या चौकशीत दरेकर यांनी घोटाळा केल्याचे समोर आले आहे. त्यानंतरही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी हे प्रकरण दाबून टाकले, आता महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण दरेकर हे बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मजूर म्हणून प्रतिज्ञापत्र देतात, तर विधान परिषदेत आमदार बनताना बिजनेसमन म्हणून प्रतिज्ञापत्र देतात. ही फसवणूक दरेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. यासाठी दरेकर यांची आमदारकी रद्द करावी, त्यांना विरोधी पक्ष नेते पदावरून काढावे अशी मागणी भाई जगताप यांनी केली आहे. दरेकर यांना पाठीशी घातल्याने आताचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा, आमदारकीचा राजीनामा द्यावा. चंद्रकांत पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
तिथी प्रमाणे जयंती घरात करा -
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला जगभरात साजरी केली जाते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने १९ फेब्रुवारीला जयंती साजरी करावी असा निर्णय घेतला आहे. छत्रपतींची जयंती एकाच वेळी धुमधडाक्यात साजरी व्हायला हवी. मात्र काही लोक आणि संस्था तिथीनुसार जयंती साजरी करतात. छत्रपतींची जयंती दोन वेळा नको, हे योग्य वाटतं नाही यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. या पत्रात ज्यांना तिथी नुसार जयंती करायची आहे त्यांना घरात किंवा संस्थेत करू द्या, तिथीच्या दिवशी जगजाहीर जयंती नको अशी मागणी मी केली आहे. माझ्या मागणीबाबत चुकीच्या अर्थाच्या बातम्या चालवण्यात आल्या, असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.