मुंबई -बेस्ट उपक्रम तोट्यात आहे. तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्टने खासगी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट ४०० बसेस कंत्राटदारकडून घेणार आहे. त्यावर ड्रायव्हर आणि कंडक्टरही कंत्राटी असणार आहे. खासगीकरणास विरोध असताना या प्रस्तावाला बेस्ट समितीची मंजुरी मिळाली आहे.
काय आहे प्रस्ताव -
बेस्ट उपक्रमाने सीएनजीवर चालणाऱ्या ४०० बसेस १० वर्षांच्या कराराने घेण्याचा निर्णय घेतला आहे. १,९४२ कोटी रुपये खर्चून या बस सेवेत उपक्रमात आणण्याचा प्रस्ताव मंगळवारी बेस्ट समितीत मंजूर झाला. परंतु आतापर्यंत भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बस सेवेसाठी चालक कंत्राटी पद्धतीने घेतले जात आहेत. मात्र, नवीन प्रस्तावात बस, चालकांपाठोपाठ कंडक्टरदेखील कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
विरोधानंतरही प्रस्ताव मंजूर -
बेस्ट समिती बैठकीत भाजपने त्या प्रस्तावास विरोध दर्शविला केला. याप्रकारे कंत्राटीकरण होत चालल्याने बेस्टचे अधिकार कायम राहणार नाहीत असा आक्षेप भाजपने घेतला. बेस्टमध्ये भाड्याने बस घेतानाच चालकापाठोपाठ कंडक्टरही खासगी स्तरावर राहिल्यास बेस्टचे काय होणार, असा सवाल बेस्ट समितीतील भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी उपस्थित केला.
सुविधेसाठी बसेस -
तर बेस्टच्या ताफ्यात लवकर बस याव्या आणि प्रवाशांना सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही हा प्रस्ताव मंजुर करायला सत्ताधारी पक्षाला मदत केली, आमचा खासगीकरणाला विरोध आहे असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले.