मुंबई -स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी श्रमिक एक्सप्रेस चालविण्यात येत आहेत. मात्र आज मुंबईतील वांद्रे टर्मिनसवरून पूरनियाला (बिहार) जाण्यासाठी ट्रेन सोडण्यात आली. यावेळी नाव नोंदणी केलेल्या मजुरांशिवाय मोठया प्रमाणात नागरिक जमा झाले, आणि पुन्हा एकदा सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी काही वेळाने त्यावर नियंत्रण तर मिळवले, मात्र पश्चिम रेल्वे प्रशासनाने याचे खापर राज्य सरकारवर फोडत सरकारकडेच बोट दाखवलं.
आज (मंगळवार) दुपारी 12 वाजता वांद्रे टर्मिनसवरून पूरनियाला (बिहार) जाण्यासाठी श्रमिक एक्सप्रेस सोडण्यात आली. या गाडीतून सुमारे १,७०० नोंदणीकृत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रवास केला.
मात्र प्रवासी नियोजन याबाबत राज्य शासन रेल्वेसोबत समन्वय साधत नसल्याचा आरोप पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.