महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चंद्रकांत पाटलांवर जमीन घोटाळ्याचे आरोप; विधिमंडळात विरोधकांचा गदारोळ

विधानसभेत विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनीटे तहकूब करण्यात आले.

विरोधकांचे आंदोलन

By

Published : Jun 27, 2019, 12:57 PM IST

मुंबई- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधकांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावरुन आज विधानसभेत चांगलेच रान पेटले. विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनीटे तहकूब करण्यात आले.

विरोधकांचे आंदोलन


पुणे जिल्ह्यातील हवेलीच्या म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या जमीनीबाबत नियम डावलून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णय दिला. ती 1885 च्या रजिस्टरमध्ये तशी नोंद नाही, म्हणून ती देवस्थानची जमीन नाही. म्हणून ती इनाम 3 ची होत नसल्याने त्याचा नजराणा सरकारला भरण्याची गरज नसल्याचा निर्णय चंद्रकांत पाटील यांनी दिला. यावर आक्षेप घेत जयंत पाटील यांनी बुधवारी आरोप केले होते. त्याला चंद्रकांत पाटील यांनी कालच उत्तर दिले होते. मात्र या कलगीतुऱ्यानंतर आज पुन्हा या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. सकाळपासूनच त्यांनी याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. गुरुवारी सकाळी विरोधीपक्षांच्या सदस्यांनी आक्रमक होत विधानभवनाच्या पायऱ्यावर फलक फडकवले आणि घोषणाबाजी केली.


या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, देवस्थानची जमीन हडपणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. यामध्ये विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह अनेक सदस्य सहभागी झाले होते.


मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन करुन भूखंड घोटाळ्याचे आरोप फेटाळले. त्यावर सभागृहात वादावादी झाली. गोंधळ वाढल्याने विधानसभा १५ मिनीटासाठी तहकूब करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details