मुंबई-हवामानातील बदल आणि वाढत्या उष्णतेचा फटका हापूस आंब्याला देखील बसत आहे. एरवी सोनेरी झळाळी असणारा आंबा तापमान वाढीमुळे काळवंडलेला, डाग पडलेला दिसत आहे. पण आंबाप्रेमींना कोकणातील अस्सल हापूस आंब्याची गोडी चाखता यावी, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या उत्तम दर्जाच्या हापूसचा आनंद घेता यावा यासाठी 'मायको'ने पाऊल उचलले आहे. ग्राहकांना उत्तम प्रतिचा, चांगला आंबा घरपोच मिळावा यासाठी 'मायको'ने वातानुकूलित गाड्यांची (रिफर व्हॅन्स)ची सोय केली आहे. या गाड्यांचा शुभारंभ परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला.
वातानुकूलित गाड्यांची सोय
कोकणातील शंभर शेतकऱ्यांनी एकत्र येत बनवलेल्या देशातील पहिल्याच 'मायको' या मँगोटेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतातील हापूस थेट जगभरातील बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. ''हापूस हाताळण्यासाठी अतिशय नाजूक फळ आहे. हापूसची बाजारपेठेत किंवा इतर प्रवासावेळी ने-आण करताना खूप काळजी घ्यावी लागते. योग्य ती काळजी न घेतल्याने आंब्यांचे नुकसान होते. पण ग्राहकांना उच्च प्रतीच्या चांगल्या दर्जेदार आंब्याची गोडी चाखता यावी यासाठी वातानुकूलित गाड्यांची सोय करण्यात आली आहे, असे 'ग्लोबल कोकण'चे संस्थापक संजय यादवराव यांनी सांगितले.
मुंबईत ३ गाड्या दाखल
हापूसची साल ही अतिशय पातळ असते. तीव्र उन्हामुळे आंब्यांची साल भाजल्याने अनेकदा आंबे काळवंडले जातात. त्यामुळे खराब झालेला आंबा फेकून द्यावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांचेही प्रचंड आर्थिक नुकसान होते. शेतकरी, आंबा बागायतदार यांचे नुकसान होऊ नये, आणि ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचा आंबा मिळावा यासाठी आम्ही वातानुकूलित गाड्यांची सोय केली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत ३ गाड्या दाखल झाल्या असून, ठाणे आणि नवी मुंबईतही या गाड्यांची सेवा येत्या काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे. असे 'मायको'च्या सह संस्थापक सुप्रिया मराठे यांनी सांगितले.
आंब्याची ऑनलाईन ऑर्डर
गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठ बंद झाली असतानाही शेतकरी थांबला नाही. उलट त्यांनी आंब्यांची थेट विक्री केल्याने त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट भाव मिळाला. शेतकऱ्यांच्या अथिक परिश्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत 'मायको' या ग्लोबल स्तरावरील मँगोटेक प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. http://www.mykofoods.com/या संकेतस्थळामुळे कोकणातील जीआय टॅग हापूस जगभरातील आंबा प्रेमींना सहज उपलब्ध होत आहे. मायकोच्या वेबसाईटवरून ग्राहकांनी आंबे ऑनलाईन ऑर्डर केल्यावर त्यांना या गाड्यांमधून आंब्यांची घरपोच डिलिव्हरी केली जाणार आहे.
हेही वाचा -बाळ बोठेला पुन्हा पोलीस कोठडी, सलग तिसऱ्या गुन्ह्यात चौकशी