मुंबई - कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. त्याच अनुषंगाने मुंबईत सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज रात्री उशिरा सुधारित परिपत्रक जारी केले.
हेही वाचा -घर खरेदीत वाढ, जुलै महिन्यात सर्वाधिक घर खरेदीची नोंद
दुकानांच्या वेळेत वाढ -
मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के आहे. तर, ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे, सध्या मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधात उद्या मंगळवारपासून शिथिलता देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालिकेने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली असली तरी सामान्यांना लोकल ट्रेन सेवा, खासगी कार्यालये, मॉल, चित्रपटगृह यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. सध्या चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असलेल्या दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.
लोकल ट्रेनमध्ये प्रवासास परवानगी नाही -
गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने, तसेच मुंबईच्या बाजूच्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास सामान्य प्रवाशांना बंदी आहे. सध्या लोकल ट्रेनमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाला परवानगी आहे. सामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली नसल्याने या पुढेही लोकल ट्रेनमधून सामान्य प्रवाशांना प्रवासास बंदी असणार आहे.