मुंबई - राज्यातील सत्ता परिवर्तनाचा परिणाम मुंबई महानगरपालिकेत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार जाऊन शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. सत्ता परिवर्तनानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्या जवळचे असलेले जी उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली करण्यात आली ( c ) आहे. दिघावकर यांच्या सह एकूण तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या जवळचे दिघावकर - मुंबई महानगरपालिकेत गेली २५ वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी करून राज्यात सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तर पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचा समावेश होता. आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगरचे पालकमंत्रीही होते. मार्च २०२० मध्ये मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार सुरु झाला. मुंबईमधील धारावी सारख्या सर्वात मोठ्या झोपड्पट्टीमधील कोरोनाला रोखण्याचे काम जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना देण्यात आली. धारावी मॉडेल राबवून दिघावकर यांनी कोरोनाचा प्रसार रोखला. तसेच, धारावीमधील कोरोनाचा आकडा शून्यावरही आणला होता. दादर चौपाटी चैत्यभूमी येथे विव्हिंग गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रेनवॉटर हार्वेस्टिंग, देशातील सर्वात मोठे कम्युनिटी टॉयलेट, माहीममध्ये नधीकृत बांधकाम केलेल्या लोकांसाठी कायमस्वरूपी पर्यायी घराची व्यवस्था करण्याचे काम किरण दिघावकर यांनी केले आहे.