मुंबई -अनेकांना नवजीवन देणाऱ्या अवयव दानासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे यावे, याकरिता विविध स्तरावर जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले. तर केईएम रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण विषयक प्रशिक्षण केंद्रामध्ये दरवर्षी सुमारे ६०० डॉक्टरांना अवयव प्रत्यारोपणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांनी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण विषयक प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या नवीन शस्त्रक्रिया गृह तथा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना सुरेश काकाणी बोलत होते.
'अवयव दानासाठी नागरिकांनी पुढे यावे' :अनेकांना नवजीवन देणाऱ्या अवयव दानासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे यावे याकरिता विविध स्तरावर जनजागृती करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने कौटुंबिक स्तरावर संवाद साधणे, अवयवदानाची पद्धत अधिक सुलभ करणे आणि रुग्णालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अवयव दानासंबंधी माहिती योग्य प्रकारे मिळावी, यादृष्टीने संबंधित अर्जामध्ये आवश्यक ते बदल करणे, असे विविध स्तरीय प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन काकाणी यांनी केले.
६०० डॉक्टरांना प्रशिक्षण :या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालनालयाचे डॉक्टर अनिल कुमार यांनी केईएम रुग्णालयाचे आणि पर्यायाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध स्तरीय कामांचे कौतुक केले. तसेच आजपासून सुरू होत असलेल्या प्रशिक्षण केंद्रामुळे अवयवदान चळवळीस बळ मिळेल असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. आजपासून सुरू होत असलेल्या अवयव प्रत्यारोपण विषयक प्रशिक्षण केंद्रामध्ये दरवर्षी सुमारे ६०० डॉक्टरांना अवयव प्रत्यारोपणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे अवयव प्रत्यारोपण अधिक प्रभावी व परिणामकारक होण्यास मदत होईल. परिणामी अनेकांना नवजिवन मिळेल, असा विश्वास याप्रसंगी अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी व्यक्त केला.
येथे करा अवयव दानाची नोंदणी :बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या डॉक्टरांना अवयव प्रत्यारोपण विषयक प्रशिक्षणासाठी नोंदणी करावयाची असेल त्यांनी rottosotto.mumbai@gmail.com या ईमेल पत्त्यावर किंवा ७०२१९३२४४७ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्यांना अवयवदान नोंदणी करावयाची असेल त्यांनी देखील याच क्रमांकावर संपर्क साधावा, असेही संबंधितांद्वारे कळविण्यात आले आहे.
हेही वाचा -ins vikrant scam : चौकशीला सामोरे जा, पळता का, संजय राऊतांचा सोमय्यांना सवाल, म्हणाले थायलंड, बँकॉकमधून जमवला निधी