मुंबई - देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने देशभरात ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने आतापर्यत ३४ ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवल्या आहेत. यातून २ हजार ६७ मेट्रिक टन वजनी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा (एलएमओ) पुरवठा करण्यात आला आहे.
२ हजार ६७ मेट्रिक टनाची वाहतूक -
भारतीय रेल्वेद्वारे महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा केला जात आहे. यासह आता ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा राज्याच्या मागणीनुसार केला जात आहे. देशभरात एकूण आतापर्यत ३४ ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यात आल्या आहेत. यामधून एकूण २ हजार ६७ मेट्रीक टन एलएमओची वाहतूक केली आहे. सर्वाधिक वाहतूक दिल्लीला करण्यात आली आहे. सुमारे ७०७ मेट्रीक टन एलएमओची वाहतूक केली आहे. उत्तर प्रदेश राज्यात ६४१ मेट्रीक टन, महाराष्ट्रात १७४ मेट्रीक टन, मध्य प्रदेशात १९० मेट्रीक टन, हरियाणा २२९, तेलंगाणा १२३ मेट्रीक टन वजनी ऑक्सिजन एक्स्प्रेसची वाहतूक केली आहे.
रेल्वेचे महत्वपूर्ण योगदान -
सोमवारी, पश्चिम रेल्वेद्वारे गुजरातमधील हापा येथून हरियाणा येथील गुरुग्राम येथे ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली होती. ८५.२३ टन वजनी चार एलएमओ टँकर १ हजार ८८ किमीचे अंतर पार करून गुरुग्राम येथे मंगळवारी पोहचली आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील ही दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली आहे. या अगोदर २५ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वे मार्गावरून हापा येथून कळंबोली येथे ४४ टन वजनी तीन टँकर दाखल झाले होते. अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. भारतीय रेल्वे कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक वस्तू आणि ऑक्सिजनच्या पुरवठा सुरळीत होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे.