कोल्हापूर -राज्यभरातील शाळा नुकत्याच ( School Start In Kolhapur ) सुरू झाल्या. अनेक शाळेत मुलांचे अगदी वाजत गाजत स्वागत करण्यात आले. शाळा वाचविण्यासाठी जे शक्य आहे, ते शिक्षक करताना पाहायला मिळतात. मात्र, दुसरीकडे 17 वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेली आजरा तालुक्यातील एक शाळा समाधानकारक पटसंख्या असूनही केवळ संस्थाचालक, जागामालक व इमारत मालक यांच्यातील वादामुळे अडचणीत आली आहे. एव्हढेच काय तर धक्कादायक बाब म्हणजे या शाळेतील मुले अक्षरशः झाडाखाली बसून शिक्षण घेत आहेत. कुठे आहे ही शाळा आणि नेमकं काय प्रकरण आहे, पाहुयात या विशेष रिपोर्ट मधून.
काय आहे नेमकं प्रकरण? -मुळातच आजरा तालुक्याचा पश्चिम भाग हा अतिपावसाचा व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथील धनगरमोळा गावामध्ये 17 वर्षांपूर्वी आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. कालांतराने स्थानिक पालकांनीही या शाळेला उत्तम प्रतिसाद देत आपल्या पाल्याला पाठवण्यास सुरुवात केली. शाळा अद्याप अनुदानित नसली तरी अनुदानाच्या टप्प्यावर आली असताना अचानकपणे येथील शाळा इमारतीचे मूळ मालक आणि ज्यांनी इमारत उभा केली, त्यांच्यामध्ये इमारतीच्या मालकीवरून जोरदार वाद सुरू झाले आहेत. हे वाद काहीही असले तरी यामध्ये विद्यार्थ्यांचे मात्र मोठे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. हा वाद आता मिटविण्याची गरज आहे. कारण शाळा इमारतीच्या वर्गखोल्यात आता चक्क जनावरे आणि मुले झाडाखाली अशी परिस्थिती दिसू लागली आहे. अनुदानाच्या टप्प्यावर असणारी ही शाळे बंद पाडण्यामागे एक यंत्रणा कार्यरत झाली असल्याचेही आता पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन मुलांच्या शिक्षणाचे होत असलेले नुकसान टाळावे, अशी मागणी होऊ लागली आहे.