कोल्हापूर - पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील दोन कॉन्स्टेबल (LCB Constable) दहा लाख रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) अँटी करप्शनच्या (Kolhapur ACB) जाळ्यात सापडले आहेत. मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देऊन 25 लाख रुपयाची लाच मागितली होती. त्यातील दहा लाख रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले असून, पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हा वकील असून त्याच्या मुलाचा कार तसेच दुचाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. वकीलांचा मुलगा हा आठ दिवसांपूर्वी मुंबईतील पनवेल येथून जुन्या वापरातील यामाहा R1 स्पोर्ट्स बाईक खरेदी करून कोल्हापुरात आणली होती. त्यातील दुचाकी भंगारमध्ये काढण्यासाठी त्यांनी रितसर परवानगी देखील घेतली होती. मात्र ही गाडी चोरीची असल्याचे सांगून सदरचे आरोपी विजय कारंडे आणि किरण गावडे या दोघांनी तक्रारदाराच्या मुलाला तू मुंबई, पुण्यातून दुचाकी चोरून आणून कोल्हापुरात विकतो काय असा जाब विचारत मोटरसायकल घरातून घेऊन गेले. मात्र सर्व कागदपत्र दाखवले असता ही गाडी चोरीची नसल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तरीही तू बोगस स्मार्ट कार्ड बनवतो असे कारण सांगून सदरच्या वकिलांच्या मुलावर मोक्का गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती घालत बदनामी करण्याची धमकी दिली. ही कारवाई टाळण्यासाठी एकूण 25 लाख रुपयांची मागणी सदर आरोपींनी तक्रारदाराकडे केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली असता, एसीबीने सापळा रचत लाचेमधील 25 लाखापैकी दहा लाख रुपये स्वीकारताना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस हवालदार विजय केरबा कारंडे ( उचगाव , चौगुले पार्क ) व पोलीस नाईक किरण धोंडीराम गावडे ( केदार नगर, मोरेवाडी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली असून संशयित कॉन्स्टेबल विरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
- पोलीस अधीक्षक कार्यालयासोमोरच कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ: -