कोल्हापूर - स्वामी समर्थ, साईबाबांचा अंगात संचार होऊन ते आज्ञा देतात आणि तेच माझ्या मुखातून बोलतात, असे सांगत अनेकांना सुमारे चार कोटींचा गंडा घालत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोल्हापुरातील तिघांवर राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील एका दाम्पत्याकडून फ्लॅट, मठ आणि गोशाळेसाठी तब्बल ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय अशा अनेक लोकांना याप्रकारेच फसवत तब्बल 3 कोटी 96 लाखांची लुबाडणूक केल्याची तक्रार संदीप नंदगावकर यांनी दिली आहे. या प्रकरणी भोंदूबाबा प्रविण विजय फडणीस (वय ४४, रा. मंगळवार पेठ), त्याचा गुरू श्रीधर नारायण सहस्त्रबुद्धे (वय ५५ रा. फुलेवाडी) आणि त्याची साथीदार सविता अनिल अष्टेकर (रा. मंगळवार पेठ) या तिघांना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा फडणीस व सहस्रबुद्धे यांचा मंगळवार पेठ येथे मठ आहे. या मठात तक्रारदार नंदगावकर, त्याची पत्नी व भाऊ दर्शनासाठी कधी-कधी जात होते. त्यांना नित्यनेमाने येण्यासाठी भोंदूबाबाने सांगितले. नियमितपणे जाणे सुरू झाल्यावर नंदगावकर व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. 2013 पासून 29 मे 2020 पर्यंत भोंदूबाबाने त्याचा गुरू श्रीधर सहस्त्रबुद्धेसह साथीदार सविता अष्टेकरच्या मदतीने फडणीस यांच्या अंगात स्वामींचा संचार होतो, स्वामींची ताकत त्यांच्यामध्ये येते, असे भासविले. तसेच श्रीधर सहस्त्रबुद्धे यांच्यात साईबाबांचा संचार होऊन त्यांच्या मुखातून साईबाबाच बोलतात, असे सांगुन पटवून दिले.
त्यांनतर नंदगावकर कुटुंबाला फसवून त्यांच्याकडून वेळोवळी जवळपास ३५ लाख रुपये लुबाडले. तक्रारदाराने आपला भाऊ प्रविण प्रकाश नंदगावकर यांचेकडून ही मोठी रक्कम घेतल्याचे व त्यासोबतच अन्य भक्तांचीही अशाच प्रकारे फसवणूक करत सर्वांना 3 कोटी 96 लाख रुपयांना गंडा घातला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या फसवणुकीविरोधात नंदगावकर यांच्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून भोंदूबाबासह तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.