कोल्हापूर - वारंवार भाजप सत्तेचा दावा का करत होतं हे आता समोर आले आहे. शासकीय यंत्रणेचा वापर करून पुन्हा सत्तेत यायचा भाजपचा प्रयत्न होता हे आता स्पष्ट झाल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, अहवाल बाहेर जातो, शिवाय फडणवीस अहवाल दाखवतात हे राज्याच्या दृष्टीनेसुद्धा घातक आहे. भाजप सत्तेसाठी काहीही करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीकासुद्धा सतेज पाटील यांनी केली. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शासकीय यंत्रणेचा वापर करून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न - सतेज पाटील
शासकीय यंत्रणेचा वापर करून पुन्हा सत्तेत यायचा भाजपचा प्रयत्न होता हे आता स्पष्ट झाल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.
राज्यातील अधिकारी असे वागण्यामागे केंद्राचा हात -
यावेळी पत्रकार परिषदेत सतेज पाटील म्हणाले, शासकीय यंत्रणेला हाताशी धरूनच भाजपचा महाराष्ट्रात सत्तेत येण्याचा प्रयत्न सुरू होता हे स्पष्ट झाले आहे. फडणवीस यांनी आपली विश्वासार्हता कायम राखायची असेल तर त्यांच्याकडे अहवाल कोणी दिला हे त्यांनी सांगितलं पाहिजे. खरंतर राज्यातले अधिकारी असे वागण्यामागे केंद्राची सत्ता आहे. केंद्राच्या दबावाला राज्यातील अधिकारी बळी पडत आहेत, असेही सतेज पाटील यांनी म्हंटले. ते पुढे म्हणाले, पोलिसांनी उंचावलेली प्रतिमा मलीन करण्याचा भाजपचा प्रयत्न केला आहे. भाजपमधील अनेक नेते महाविकास आघाडीत येण्यासाठी तयार आहेत. त्यांना आधार मिळावा म्हणून सत्तेत येणार हे वारंवार सांगत असतात. दरम्यान, केवळ एकाच अपक्ष आमदाराने धाडस करून शुक्ला संपर्कात होत्या हे कबुल केले आहे. मात्र त्या राज्यातील अनेक अपक्ष आमदारांच्या संपर्कात असण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यात ते सुद्धा स्पष्ट होईल, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा -5 एप्रिलपर्यंत थकित 'एफआरपी' न दिल्यास कारखानदारांना धडा शिकविणार - राजू शेट्टी