कोल्हापूर -कमी काळात जास्तीत जास्त पैसे मिळतील, असे अमिष दाखवून कोल्हापूरसह राज्यातील हजारो शेतकऱ्यांना एका कंपनीने कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. महारयत अॅग्रो इंडिया असे या कंपनीचे नाव सांगत आपली मोठी फसवणूक केली असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्याबाबत स्वतः शेतकऱ्यांनीच आता पुढे येऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
कडकनाथ कुकूटपालनात गुंतवणूक करा आणि दुप्पट उत्पन्न कमवा या योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. जवळपास 500 कोटींचा हा घोटाळा असल्याचे आता समोर येत आहे. कोल्हापूरसह सांगली आणि महाराष्ट्रातील अनेक भागांतील शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक केल्याचे समोर आले आहे. एका युनिटसाठी 75 हजार रुपये भरून 200 कडकनाथ पक्षी देण्यात आले. कंपनीकडून प्रत्येक युनिटसाठी पक्षांचे खाद्य, वैद्यकीय तपासणी, औषधे आणि काही भांडी दिली जातात. जेव्हा काही महिन्यांनंतर या कोंबड्या अंडी द्यायला सुरुवात करतात तेव्हा पहिली 2 हजार अंडी प्रतिनग 50 रुपये प्रमाणे, दुसरी 2 हजार अंडी प्रतिनग 30 रुपये तर शेवटची साडे 3 हजार अंडी 20 रुपये या दराने कंपनी विकत घेते. पक्षी मोठे झाल्यावर 200 पक्षांमधील 120 पक्षी 375 रुपये प्रमाणे परत घेतले जातात. सगळे मिळून जवळपास पावणे दोन लाख रूपयांचा नफा केवळ एका वर्षात मिळवून देण्याची ही योजना आहे.
या योजनेसाठी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील 8 हजारांहून अधिक जणांनी गुंतवणूक केली असल्याचे समोर आले आहे. थोडे दिवस सर्वकाही ठीक सुरू झाले. मात्र, काही काळानंतर कंपनीकडून पक्षांचा खाद्यपुरवठा बंद झाला. अंडी घ्यायचे बंद झाले. कोंबड्यांनी घातलेली अंडी ठेवायची कुठे हा प्रश्न सुद्धा अनेक गुंतवणूकदार शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. अनेकांनी तर 10 ते 15 युनिटसाठी आपले पैसे गुंतवले आहेत. त्यांना एक पक्षीसुद्धा अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार शेतकरी आता संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.