कोल्हापूर - कोल्हापुरात गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून चामडी चप्पल उद्योग सुरू आहे. इथल्या कारागिरांनी बनविलेल्या चपलांच्या दर्जामुळे या चपलांना कोल्हापूरी चप्पल म्हणून ओळख निर्माण झाली. आज कोल्हापूरी चप्पल अगदी सामान्य माणसापासून अगदी बॉलिवुड, तसेच हॉलिवूडमधील अभिनेत्यांनी सुद्धा परिधान केल्याचे आपण पाहिले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हा चर्मोद्योग वाढण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आज कोल्हापुरी चप्पलला इतके चांगले दिवस आले आहेत. त्यामुळेच, त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आज 15 मे रोजी प्रशासनाकडून कोल्हापुरी चप्पल डे साजरा केला जात आहे. शिवाय या व्यवसायाला आणखी सर्वदूर पोहचविण्यासाठी सर्वांनी चप्पल खरेदी करून ते परिधान करण्याचे आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार आज 'कोल्हापुरी चप्पल डे' निमित्ताने येथील चप्पल लाईनसुद्धा ग्राहकांनी गजबजलेली पाहायला मिळाली.
हेही वाचा -Aurangzeb Grave Controversy :...तर अकबरुद्दीन ओवैसींवर महाराष्ट्र बंदीचा विचार करु - हसन मुश्रीफ
देशभरातील दिग्गज सुद्धा वापरतात कोल्हापुरी चप्पल -राजर्षी शाहू महाराजांनी अनेक कला, क्रीडा आणि विविध क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी सोहळ्यानिमित्त सर्वजन कृतज्ञता पर्व साजरे करत आहे. याच दरम्यान कोल्हापूरच्या अनेक ओळखींपैकी एक ओळख म्हणजे कोल्हापुरी चप्पल. छत्रपती शाहू महाराजांनी ज्या अनेक कला-क्रीडा तसेच उद्योगांना प्रोत्साहन दिले त्यामध्ये कोल्हापुरातील चर्मोद्योग सुद्धा एक होता. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहन आणि राजाश्रयामुळेच 'कोल्हापुरी चप्पल' आज देश-विदेशात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. शिवाय एक ब्रँड बनला आहे.
'कोल्हापुरी चप्पल' कोल्हापूरच्या अनेक वैशिष्ठांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून कोल्हापुरी चप्पलबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय अनेक अभिनेते-अभिनेत्री, दिग्दर्शक, गायक, क्रिकेटर अनेक वेळा 'कोल्हापुरी चप्पल' परिधान करताना पाहायला मिळतात. कोल्हापूरची हीच ओळख कायम ठेवण्यासाठी तसेच यापुढेही ही ओळख सर्वदूर पसरविण्यासाठी कोल्हापूर प्रशासनाकडून आज 15 मे रोजी कोल्हापूर चप्पल दिवस साजरा केला जात आहे. नागरिक सुद्धा चप्पल खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडल्याचे दिसून येत आहे.