कोल्हापूर - कोल्हापूरच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजकीय सोयीस्कर भूमिका नजरेत ठेवून हद्दवाढ न करू पाहणाऱ्या नेत्यांनाच आता कृती समितीने थेट आव्हान दिले आहे. कोल्हापूर शहराची रखडलेली हद्दवाढ व्हावी यासाठी जनआंदोलनाची मशाल पेटवण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत याचे परिणाम दिसतील असा इशारा कृती समितीने दिला आहे.
शहराशेजारी असणाऱ्या १८ गावांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव
कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यापासून चार दशके हद्द विस्तारली नाही. कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ समर्थक कृती समितीच्या वतीने माध्यमातून अनेक वर्षांपासून आंदोलन केले गेले. कोल्हापूर शहराच्या भौगोलिक रचनेचा विचार करता येथे ४० टक्के जमिनीवर निवासी रहिवास आहे. तर, उर्वरित जमीन शेतीची असल्याने शहराचा पुरेसा विकास झाला नाही. मात्र, सध्या कोल्हापूरची पूर्व आणि दक्षिण बाजूला शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शहराशेजारी असणाऱ्या १८ गावांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी शहराचा आणि त्यातील गावांचा विकास नाही
कोल्हापूर महापालिका शहरातील लोकांना नागरी सुविधा पुरवण्यात अपयशी ठरली असल्याने ग्रामीण भागातील जनता महापालिकेत समाविष्ट व्हायचे नाही असा निर्धार करीत विरोधाचे हत्यार उपसत आहे. परिणामी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचे आतापर्यंत अनेक प्रस्ताव तयार झाले. पण ग्रामीण भागाच्या विरोधामुळे ते बासनात गुंडाळावे लागले. हद्दवाढ समर्थक आणि ग्रामीण विरोधक यांच्यातील संघर्ष तापल्यानंतर यावर पर्याय म्हणून ४२ गावांचा समावेश असलेल्या कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची घोषणा ऑगस्ट (२०१७)मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी शहराचा आणि त्यातील गावांचा विकास झाला नसल्याने 'प्राधिकरण नको' अशी कोल्हापूरकरांची भावना प्रबळ होत राहिली. दुसरीकडे ग्रामीण भागातील जनता हद्दवाढीसाठी विरोधाचे हत्यार घेऊन सरसावली आहे. हद्दवाढीचा जुना वाद, विरोधाची कारणे तपासली तर प्रकरण दिसते तितके सोपे मुळीच असणार नाही.
उठता बसता कोल्हापूरात मग विरोध का?