कोल्हापूर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपाचे नेते किरीट सोमैया यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी किरीट सोमैयांना इशारा दिला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खुलासा दिल्यानंतर सोमैयांनी कोल्हापुरात येण्याची गरज काय? विनाकारण मुश्रीफ यांना टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
हेही वाचा -नो एन्ट्री... किरीट सोमैयांना कोल्हापूरच्या मुरगूड शहरात कायमची बंदी, नगरपरिषदेचा ठराव
'सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न'
सतेज पाटील पुढे म्हणाले, की सोमैया हे हसन मुश्रीफ यांना विनाकारण बदनाम करत आहेत. त्यांचा तो प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपा आणि सोमैया यांचा आहे. हाच प्रयत्न हाणून पाडू. मुश्रीफ यांनी यापूर्वीच खुलासा दिला असताना किरीट सोमैया यांना पुन्हा कोल्हापुरात येण्याची गरज काय? शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोमैया यांनी कोल्हापुरात येऊ नये, अशी विनंती सतेज पाटील यांनी केली आहे. आम्ही मुश्रीफ यांच्या पाठीशी ठामपणे आहोत. मुश्रीफांच्यावरील आरोप निराधार आहेत. वेळ आल्यावर सर्व बाहेर येईल, असेदेखील पाटील म्हणाले.