कोल्हापूर - विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार समारंभात आज नाराजी नाट्य पाहायला मिळाले. कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे आज पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या अरुण लाड आणि जयंत असगावकर दोन्ही नूतन आमदारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभातून शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी व्यासपीठावरच जाहीर नाराजी व्यक्त केली आणि समारंभ स्थळावरून ते बाहेर पडले. निवडून आल्यानंतर दोन्ही आमदारांनी साधा फोन केला नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीसुद्धा भेट घेतली नाही. त्यामुळे दोन्ही आमदार जोपर्यंत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचे आभार मानत नाहीत तोपर्यंत आमची नाराजी दूर होणार नसल्याचं दोन्ही जिल्हाध्यक्ष यांनी म्हटले आहे.
विजय देवणे आणि संजय पवार यांच्यासोबत प्रतिनिधी शेखर पाटील यांनी साधलेला संवाद पालकमंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी फोन केले.. मात्र, नूतन आमदारांनी केले नाही -
तीन पक्ष एकत्र मिळून विधान परिषदेची निवडणूक पार पाडली. यामध्ये मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी फोन केले. मात्र, निवडून आलेल्या दोन्ही उमेदवारांनी मात्र फोनसुद्धा केले नाहीत. एव्हढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीसुद्धा भेट घेतली नसल्याचे शिवसेनेचे दोन्ही जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि विजय देवणे यांनी सांगितले आहे.
आमची भावना व्यक्त करणे आमचं कर्तव्य -
तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून निवडणूक लढवली. मात्र, निवडून आल्यावर सेनेला विसरणे योग्य नाही. आजच्या सत्कार समारंभाचे आम्हाला निमंत्रण होतं. त्यानुसार आम्ही कार्यक्रमाला आलो. शिवाय व्यासपीठावर आमची भावना व्यक्त केली. आमची इतर कोणावर काहीही नाराजी नाही. मात्र, तुम्ही केवळ उद्धव ठाकरे साहेबांना भेटून त्यांचे आभार आणि अभिनंदन करणे गरजेचे आहे, असेही सेनेच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी सांगितले आहे.