महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरात अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत पार्टी! वाचा काय होते कारण...

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पोर्ले तर्फ ठाणे येथे दिनकर चौगुले या पठ्ठ्याने आपल्या मित्रांना, तसेच आप्तेष्टांना चक्क स्मशानभूमीत पार्टी दिली. तेही अमावास्येच्या रात्री. लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याच्या उद्देशाने चौगुले यांनी ही अनोखी पार्टी दिली.

By

Published : Dec 8, 2021, 6:40 PM IST

dinkar Chougule gave party in cemetery
स्मशानभूमी पार्टी दिनकर चौगुले

कोल्हापूर - आपला वाढदिवस किंवा आनंदाचा क्षण एन्जॉय करण्यासाठी मित्रांना पार्टी देणे हे काही आता नवे राहिलेले नाही. पण, हीच पार्टी जर एखाद्या स्मशानभूमीत असेल तर? आश्चर्य वाटले ना. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पोर्ले तर्फ ठाणे येथे दिनकर चौगुले या पठ्ठ्याने आपल्या मित्रांना, तसेच आप्तेष्टांना चक्क स्मशानभूमीत पार्टी दिली. तेही अमावास्येच्या रात्री. लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याच्या उद्देशाने चौगुले यांनी ही अनोखी पार्टी दिली.

माहिती देताना दिनकर चौगुले आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा -Kolhapur Crime : खाऊ देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

इतकच नाही तर, अंधश्रद्धा निर्मुलनावर प्रबोधन करत भूत दाखवणाऱ्या मांत्रिकांना 25 लाखांचे बक्षीस देखील दिनकर चौगुले यांनी याच पार्टीत जाहीर केले होते. स्मशानभूमीत आकर्षक विद्युत रोषणाई, लेझीमचा पारंपरिक खेळ आणि त्यासोबतच गप्पांचा फड रंगलेल्या अशा आगळ्यावेगळ्या पार्टीची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

काय आहे नेमका प्रकार?

समाजातील अनेक चालीरूढी, परंपरांच्या माध्यमातून लोकांच्या मनात अंधश्रद्धेचे भूत मानगुठीवर बसलेले आहे. ते उतरविण्यासाठी दिनकर चौगुले यांनी भूतांचा शोध, असा अंधश्रद्धा निर्मुलनासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी अमावस्येच्या रात्री राहून भूतांबाबत असणाऱ्या गैरसमजुतीचा शोध घेतला. ना भूत दिसले, ना कोणत्याही मायावी शक्तीचा त्रास झाला. यावेळी त्यांनी स्मशानभूमीत पार्टीचेही आयोजन केले होते. त्यांनी आपले मित्रमंडळी आणि गावातील लोकांना या पार्टीचे निमंत्रण दिले होते.

पार्टीत अनेकांनी फळांचा आणि वरण भाताचा स्वाद घेऊन अनेक अंधश्रद्धेला छेद दिला. दरम्यान, यावेळी भूत वगैरे काहीही नसते. जर कोणी आहे म्हणत असेल तर, भूत दाखविणाऱ्याला 25 लाख रुपये बक्षीस देणार असे म्हटले. त्यामुळे, अशा मांत्रिकांनी समोर यावे, असे आव्हानसुद्धा त्यांनी दिले. दरम्यान, चौगुले यांनी गतवर्षी पोहाळेतर्फ आळते येथील स्मशानभूमीत मुलांच्या सहलीचे आयोजन करून त्यांच्या मनातील भुताबाबत असलेली भीती काढून टाकली होती. असे अनेक धाडसी प्रयोग त्यांनी या आधीही केले आहेत.

भूत दाखवा 25 लाख घ्या

स्मशानभूमीत पार्टी आणि वरणभाताचे भोजन घालण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. विज्ञान युगात अनेक मांत्रिक माणसात शिरलेले भूत उतरविण्याचा मायावी प्रयोग करत आहे. मात्र, त्यांनी मला भूत दाखवले तर, मी 25 लाखांचे बक्षीस देईन आणि जर नाही दाखवले तर, त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेईन, असेही सर्पमित्र दिनकर चौगुले यांनी म्हटले.

हेही वाचा -Panchganga Pollution Issue : मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश देऊनही कंपन्यांकडून पंचगंगेचे प्रदूषण सुरुच!

ABOUT THE AUTHOR

...view details