औरंगाबाद- महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा एका बाळंत शिक्षिकेला मनस्ताप सोसावा लागत आहे. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली महिला शिक्षिका बदली घेऊन शहरात आली. मात्र तिला नियुक्ती तर दिली नाहीच, त्याचबरोबर तिला आठ महिन्यांपासून पगारही पालिकेने दिला नाही. त्यामुळे हातात तान्हुलं मूल घेऊन तिला पालिकेच्या चकरा माराव्या लागत आहेत.
मोनिका रेवन चव्हाण असे या शिक्षिकेचे नाव असून त्या पहिले वैजापूर नगरपरिषदच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पती पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत त्यांची बदली औरंगाबाद महापालिकेच्या शाळेत करण्यात आली. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून पालिकेने नियुक्ती दिली नाही.
औरंगाबाद महापालिकेच्या इमारतीत मोनिका रेवन चव्हाण या शिक्षिका गेल्या काही दिवसांपासून आपल्या दोन मुलांना घेऊन चपला झिजवत आहे. मोनिका वैजापूर येथील नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचे पती औरंगाबादच्या एका खासगी संस्थेत लिपिक पदावर काम करतात. शासनाच्या पती - पत्नी एकीकरण योजनेअंतर्गत त्यांनी औरंगाबादला बदलीसाठी अर्ज केला. अर्ज केला, त्यावेळी त्या गर्भवती होत्या. अशा अवस्थेत नऊ महिने पूर्ण होईपर्यंत त्यांनी काम केले. अचानक त्यांची बदली औरंगाबादला करण्यात आली. विनंती मान्य झाल्याने त्या आनंदी होत्या. त्यानंतर त्या औरंगाबादला आल्या आणि महापालिकेत बदलीचे कागदपत्र त्यांनी दाखल केले. बाळंतपणाची सुट्टी त्यांनी घेतली.
या काळात महापालिकेने त्यांचे नवीन नियुक्तीपत्र काढलेच नाही. इतकेच काय तर या काळात त्यांचे वेतन देखील महापालिकेने दिले नाही. त्यांची प्रसूती रजा संपल्यावर गेली काही दिवस त्या आपल्या दोन मुलांसह महापालिकेत नियुक्त पत्र मिळावे आणि थकीत वेतन मिळण्यासाठी येत आहेत. महापालिकेचे अधिकारी त्यांना तुमची फाईल या टेबलवर आहे, तर कधी त्या टेबलवर आहे अशी उडवाउडवीची उत्तर देत आहेत. त्यामुळे आता दाद मागावी कोणाकडे असा प्रश्न मोनिका यांना पडला आहे. मोनिका नवजात मूल घेऊन उन्हात पालिकेच्या चकरा मारत आहेत. अशा अवस्थेत पालिकेच्या अधिकाऱ्यांना माणुसकी दाखवावी वाटत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल.