औरंगाबाद -आर्यन खान प्रकरणात काही बोलणार नाही, ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांची सुनावणी होते आणि त्यांची जामीनही होतो आणि तिकडे ख्वाजा युनिस यांचा अजून मृतदेह मिळाला नाही. मुंबई ब्लास्टबाबत आमच्या लोकांवर असाच अन्याय झाला मात्र कुणी विचारले नाही. महाराष्ट्राच्या जेलमध्ये दलित आणि आदिवासी भरून ठेवले आहेत. आमचे सरकार फक्त श्रीमंतांसाठी आहे का, जामीन फक्त श्रीमंतांना मिळणार की गरिबांनाही मिळणार. वानखेडेंवर आरोप होतोय त्यावर मला काही बोलायचं नाही. पैशांनीच फक्त न्याय मिळणार का? हा आमचा प्रश्न आहे, ही लोक निवडणुकीत मतदानाला तरी बाहेर निघतात का सांगा, असा सवाल खा. असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला.
मुस्लिम आरक्षणासाठी आता एमआयएम आक्रमक होताना दिसत आहे. मुस्लिम आरक्षणासाठी 27 नोव्हेंबर मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. राज्यातून सगळीकडून आमचे कार्यकर्ते तिरंगा हातात घेऊन मुंबईला पोहोचणार आहेत. मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्यासाठी पक्ष आक्रमक होणार आहे. तिरंगा रॅली नंतर अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी यांची मुंबईत जंगी सभा होणार आहे, अशी माहिती खा. इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हायकोर्ट म्हणते महाराष्ट्रातले मुसलमान गरीब आहेत, त्यांना शिक्षणात आरक्षण मिळायला हवे. मात्र महाराष्ट्रात फक्त मराठा आरक्षणाबाबत बोलले जाते. न्याय म्हणतो यांना आरक्षण मिळायला हवे, मुसलमानांची साक्षरता, कमाई सगळ्यात कमी आहे. तुम्हाला मुसलमानांकडून मते हवी मात्र त्यांना विकास द्यायचा नाही, हे सरकार राज्यातील मुसलमानांसाठी काम करत नाहीये. हे स्पष्ट आहे. इथल्या राजकीय पक्षांनी जनतेला खास करून मुस्लिम समाजाला फसवले, असा आरोप एमआयएम प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकार परिषदेत केला.