औरंगाबाद- वाळूज येथून लग्न समारंभ आटोपून घराकडे वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटुन झालेल्या या अपघातात १ महिला आणि १ पुरुष ठार झाले तर, १४ जण जखमी झाले आहेत. हा अपघात औरंगाबाद-अहमदनगर मार्गावरील शिवराई फाट्याजवळील काळ्यापुलावर रविवारी सायंकाळी घडला.
वऱ्हाड नेणाऱ्या गाडीला वाळुज येथे अपघात, २ ठार आणि १४ जखमी
शिवराईजवळ चालक राजेंद्र नामदेव काटकर याचा ताबा सुटल्याने छोटाहत्ती सरळ काळ्यापुलाखाली २० फुट झाडात जावून अडकला.
पडेगाव, औरंगाबाद येथुन लग्न समारंभ आटोपुन वऱहाड नवाराकडे (ता. संगमनेर जि. अहमदनगर) छोटाहत्ती वाहन क्रमांक (एमएच १७ बीडी ६०६२) ने जात होता. वाळुजच्या पुढे शिवराईजवळ चालक राजेंद्र नामदेव काटकर याचा ताबा सुटल्याने छोटाहत्ती सरळ काळ्यापुलाखाली २० फुट झाडात जावून अडकला. यावेळी वाहनात १६ वऱहाडी होते. यापैकी सिताराम पांडुरंग चांगले (वय ७८) आणि शिंधुबाई भिमराज चांगले (वय ७०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, गाडीतील इतर १४ जण जखमी झाले, त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच शिवराई येथील गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना पुलाखालुन वर काढण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाळुज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत राठोड, पोलीस कॉन्स्टेबल शेखर राऊतवार, दत्तात्रय गरड यांनी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद वाळुज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.