औरंगाबाद -महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा ( Aurangabad Muncipal Election ) झाला आहे. प्रभाग रचना व आरक्षण अंतिम करावे असे निर्देश राज्य निवडणूक ( State Election Commission ) आयोगास देण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती स्वीकारून राज्य निवडणूक आयोगास आदेश दिले. औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचना संदर्भात याचिकाकर्ते समीर राजूरकर, नंदू गवळी, गणेश दीक्षित, अनिल विधाते यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती ए.एस.बोपन्ना व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठा समोर सविस्तर सुनावणी झाली.
'हेतू साध्य झाल्या असल्याने ती निकाली काढावी' -
सुनावणी दरम्यान नव्याने प्रभाग रचना करण्यात येणार असल्याने याचिकेचा हेतू साध्य झाल्या असल्याने ती निकाली काढावी, असा युक्तिवाद राज्य निवडणूक आयोगा तर्फे करण्यात आला. नव्याने प्रभाग रचना होणार असल्याने याचिका निकाली काढण्यास याचिकाकर्त्यांनी सहमती दर्शविली. मात्र, पूर्वीच्या प्रभाग रचनेत गोपनीय माहिती मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांना पुरवण्यात आली होती व त्याआधारे बेकायदेशीर प्रभाग रचना करण्यात आली होती. ही बाब राज्य निवडणूक आयोगाने खंडपीठासमोर शपथ पत्राद्वारे मान्य केली होती.