औरंगाबाद -सामाजिक संस्थांमार्फत निराधार मुलांचे संगोपन ही आजच्या काळात चिंतेची बाब झाली आहे. त्यात सामाजिक संस्थांसोबत सरकारी यंत्रणा या दोघांमुळे मुलांना सुविधा म्हणाव्या तशा मिळत नसल्याचं वारंवार समोर आलं आहे. काही सामाजिक संस्था निधी अभावी सुविधा देऊ शकत नाहीत, तर काही ठिकाणी शासकीय निधी संस्थांना मिळतो खरा मात्र, संस्था तशा सुविधा निराधार मुलांना देत नाहीत. त्यामुळे शासकीय यंत्रणेचा वचक संस्थांवर असायला हवा असे मत सामाजिक कार्यकर्ते मनोज वाकोडे यांनी व्यक्त केलं.
काही संस्थांना निधी नाही, तर काहींना निधी मिळूनही होत नाही वापर; औरंगाबादमधील सामाजिक संस्थांची दुरावस्था निधी नसल्याने भोजन व्यवस्था विस्कळीत..
महिला बालकल्याण विभागातर्फे सामाजिक संस्थांना निराधार मुलांचा सांभाळ करताना त्यांच्या भोजनासाठी मुलामागे बाराशे ते दीड हजार रुपये दिले जातात. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते मनोज वाकोडे यांनी व्यक्त केलं. मिळणारी मदत कमी आहे त्यात ही मदत वेळेवर मिळेल याची शास्वती नसते. मिळणारी मदत सर्वच सामाजिक संस्थांना मिळते अस नाही, कारण अनेक सामाजिक संस्था समाजातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर संस्था चालवतात. कधी मदत मिळते तर कधी मिळणारी मदत कमी असते त्यामुळे काही वेळा भोजन व्यवस्था विस्कळीत होते. त्यामुळे मिळणारी आर्थिक मदत पुरेशी हवी, आणि त्यावर शासकीय यंत्रणेचे लक्ष असायला हवे असे मत देखील वाकोडे यांनी व्यक्त केलं.
शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा महत्वाच्या..
नुराधार मुलांचा सांभाळ करत असताना अन्न, वस्त्र, निवारा सोबत शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देखील महत्वाच्या आहेत. या मुलांना योग्य शिक्षण मिळत तर त्यांचं भविष्य घडणार आहे. त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी मदत होईल मात्र त्यासाठी त्यांना योग्य शिक्षण, शिकवणी विशेष कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्याच बरोबर गरजेनुसार वैद्यकीय सुविधा मिळायला हवी. त्यासाठी लागणारा निधी वेळेवर मिळणे आवश्यक आहे. मात्र अनेक वेळा तसं होत नाही परिणामी निराधार मुलांना आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. असे मत मनोज वाकोडे यांनी व्यक्त केलं.
मुलींच्या आश्रमात घ्यावी लागते विशेष काळजी..
मुलांच्या आश्रमांपेक्षा अधिकची काळजी मुलींच्या आश्रमांमध्ये घ्यावी लागते. मुलींची काजळी घेण्यासाठी महिला कर्मचारी कार्यरत असणे गरजेचे आहे. मात्र काही ठिकाणी मात्र तसे होत नाही. विशेषतः मुलं आणि मुली एकत्रित वास्तव्यास असणाऱ्या आश्रमांमध्ये महिला कर्मचारी असायला हवी. कारण मुलींना येणाऱ्या अडचणी आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेता महिला कर्मचारी असणे अनिवार्य असते याकडे देखील प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष असायला हवे.
एका आश्रमात धक्कादायक प्रकार झाला उघड..
औरंगाबाद पासून काही अंतरावर असलेल्या मतिमंद निवासी आश्रमात नुकताच एक धक्कादायक प्रकार उघड झाला होता. महिला अधिकारी पाहणीसाठी गेले असताना मुलं आणि मुलींना एकत्रित अंघोळ घातली जात होती. त्यावेळी महिला अधिकाऱ्याने त्याच चित्रकरण करून महिला बालकल्याण विभागाच्या निदर्शनास सर्व प्रकार उघडकीस आणला होता. अशा घटनांवर शासकीय यंत्रणांचे लक्ष असावे, सामाजिक संस्थांवर प्रशासकीय वचक असायला हवा असे मत सामाजिक कार्यकर्ते मनोज वाकोडे यांनी व्यक्त केलं.