औरंगाबाद - अन्य बॅंकांप्रमाणेच जिल्ह्यात पहिल्यांदाच वृक्ष बँक साकारण्यात आली आहे. या बँकेत दिलेली वृक्ष वाढवून तुम्हाला परत दिली जातात. तसेच झाडे वाढवण्याबाबत देखील प्रात्यक्षिके पार पडतात. सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून वाळूज सिडको येथे ही वृक्ष बँक सुरू करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत या बँकेचे 127 सभासद झाले असून 9 हजार 770 वृक्ष ठेव स्वरुपात या बँकेत संगोपनासाठी ठेवण्यात आल्याची माहिती वृक्ष बँकेचे प्रमुख पोपटराव रसाळ यांनी दिली.
याचवेळी वृक्षबँकेची संकल्पना त्यांनी मांडली. त्यावरून पोपटराव रसाळ यांच्या फाउंडेशनच्या सदस्यांनी काम करायला सुरुवात केली. वृक्षबँक तयार करत असताना त्याची नियमावली आणि कार्यशैली ठरवण्यात आली. या वृक्षबँकेत झाड लोकांनी ठेवायचे आणि दीड वर्षांनी ते झाड पुन्हा नेऊन त्याची लागवड आणि संवर्धन त्या ठेवीदाराने करायचे, अशी नियमावली तयार करण्यात आली. वृक्ष देताना एक हमीपत्र लिहून घेण्यात येते. यामध्ये दीड वर्षांनी वृक्षाची लागवड करण्याचे आश्वासन लिखित स्वरुपात घेण्यात येते. एका वृक्षाचे संगोपन करण्यासाठी दीड वर्षांसाठी दहा रुपये इतके शुल्क आकारून बँकेचे सदस्यत्व दिले जाते. या दहा रुपयांमध्ये त्या रोपट्याला लागणारे खत, पाणी, औषधी फवारणी ही कामं केली जातात. रोपटे बँकेत आल्यावर त्यांचा तोच दिवस त्याचा जन्म दिवस म्हणून गृहीत धरला जातो. प्रत्येक महिन्याला एका ठराविक तारखेला रोपट्याचा फोटो काढून वृक्षठेवीदाराला पाठवला जातो. सोळा महिने झाल्यावर वृक्षबँक सदस्याला स्मरण देण्यात येते. दोन महिन्यांनी वृक्षांची लागवड करण्याबाबत तयारी करण्यास सांगितले जाते. त्यानंतर झाडांसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत का, याची पाहणी फाउंडेशनचे सदस्य करणार आहेत. तसेच वृक्ष लागवड केल्यावर प्रत्येक सहा महिन्यांनी पाहणी केली जाणार आहे. अशा पद्धतीने वृक्ष बँकेचे काम चालणार आहे.
वृक्षबँकेची स्थापना सहा महिन्यांपूर्वी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. सहा महिन्यांत 127 जणांनी या अनोख्या बँकेचे सभासद म्हणून नोंदणी केली असून त्या माध्यमातून 9770 रोपटे संगोपनासाठी बँकेत ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील शाळांमध्ये यापुढे वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती वृक्षबँकेचे प्रमुख पोपटराव रसाळ यांनी दिली. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला एक झाड संवर्धनासाठी देण्याची योजना आखण्यात येत असून वृक्ष लागवड पेक्षा वृक्ष संवर्धन करण्याबाबत जनजागृती करणार असल्याचे पोपटराव रसाळ यांनी सांगितले.
नागरिकांचा सहभाग वृक्षबँकेच्या पथ्यावर