औरंगाबाद - शहरातील जालना रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जागेवर अतिक्रमण करून नियमबाह्य इमारती उभारल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. यात किमान शंभर कोटींचा घोटाळा झाला असून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अन्यथा 26 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा जलील यांनी दिला आहे.
औरंगाबादेत वक्फ बोर्डाच्या जागेवर बिल्डरचा कब्जा, 100 कोटींच्या घोटाळ्याचा जलील यांचा आरोप
वक्फ बोर्डाच्या जागा विकू शकत नाही तरीदेखील जालना रस्त्यावरील एक लाख स्क्वेअर फुट जागेची विक्री करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मोठे व्यापारी संकुल बांधण्यात आले ,असा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.
वक्फ बोर्डाच्या जमिनीची नियमबाह्य विक्री
वक्फ बोर्डाच्या जागा विकू शकत नाही तरीदेखील जालना रस्त्यावरील एक लाख स्क्वेअर फुट जागेची विक्री करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मोठे व्यापारी संकुल बांधण्यात आले ,असा आरोप खासदार जलील यांनी केला आहे. कैलास बाफना नावाच्या इसमाला ही जागा वक्फ बोर्डाने 99 वर्षांच्या करार पद्धतीवर दिली होती. बाफना यांनी तापडिया आणि कासलीवाल बिल्डर सोबत करार केला आणि महानगरपालिकेला व्यापारी संकुल बांधण्याची परवानगी मागितली. मात्र पालिकेने परवानगी नाकारत बोर्डाचे नाहरकत प्रमाणपत्र आणायला सांगितले. तरी देखील इथे भव्य संकुल उभे कसे राहिले असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
शिवसेना कार्यकर्त्यांच्या मदतीने उभे राहिले संकुल-जलील
इमारत उभारण्यासाठी कासलीवाल बिल्डरने पुढाकार घेतला. मात्र पालिकेने परवानगी नाकारल्यावर त्यांनी स्वतःहून या प्रकल्पातून माघार घेतली. मात्र यानंतर शिवसेनेचे राजू तनवाणी यांनी प्रवेश केला. वक्फ लवादानेही 2018 मध्ये निकाल दिला. हा व्यवहार चूक असून इथे बांधकाम परवानगी योग्य नाही. हे सगळं रद्द करण्यात यावं असं लवादाच्या शिफारशीत सांगण्यात आलं होतं. लवादाच्या आदेशानंतरही जागा विकली गेली. त्याचे पैसे देखील आले आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकाम सुद्धा करण्यात आले. हा सगळा व्यवहार जवळपास एकशे पाच कोटींचा असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.
शासकीय यंत्रणा दोषी
या घोटाळ्यात महानगरपालिका अधिकारी, रजिस्टर ऑफिस अधिकारी, लँड रेकॉर्ड ऑफिस आणि वक्फ बोर्डाने ज्यांना जमीन लीजवर दिली होती ते सर्व यात दोषी आहेत. या सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. ही कारवाई झाली नाही तर माझ्यासोबत किमान एक हजार लोक घेऊन 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
हेही वाचा -बंदूक दाखवून रस्त्यावर दादागिरी! इम्तियाज जलील यांचा शिवसेनेवर निशाणा