अमरावती- महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारार्थ आलेल्या सुनिल शेट्टीवर भुयारी मार्गातून पळ काढत रुग्णालयात लपण्याची वेळ आली. नवनीत राणा यांची सभा तिवसा येथील ग्रामपंचायत चौकात बुधवारी रात्री आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुनिल शेट्टीला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाल्याने सुनिल शेट्टीने रुग्णालयात लपून बसणे पसंत केले. यावेळी पोलिसांनी बळाचाही वापर केला.
प्रचार सभेत आलेला अभिनेता सुनील शेट्टी भुयारी मार्गातून पळ काढत रुगणालयात लपला तेव्हा. . . ..
नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारार्थ आलेल्या सुनिल शेट्टीवर भुयारी मार्गातून पळ काढत रुग्णालयात लपण्याची वेळ आली.
तिवसा येथे प्रचार सभेत अभिनेता सुनील शेट्टी येणार असल्याने तिवसा शहरासह ग्रामीण भागातून नागरिक त्याला पाहण्यासाठी आले होते. यात प्रचंड उत्सुकता नागरिकांना लागली असताना सुनील शेट्टी रात्री 10.10 मिनिटामध्ये सभा मंडपात दाखल झाला. यावेळी लोकांना हात दाखवून सुनील शेट्टीने लोकांना अभिवादन केले. यात नागरिकांनी स्टेज व मंडपाजवळ घेराव घातला होता.
यात सुनील शेट्टीला बाहेर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्याने स्टेजमागील बाजूस भुयारी मार्गातून उडी घेतली. त्यानंतर थेट या भुयारी मार्गातून पळ काढत सुनील शेट्टी तिवसा ग्रामीण रुग्णालयात गेला. त्यामुळे नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात घेराव घातला. या ठिकाणी बोटावर मोजता येणारे पोलीस हजर होते. त्यामुळे हा गोंधळ उडाला. अखेर तिवसा पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना हटवण्यासाठी बळाचा वापर केला. अखेर गर्दीतून सुनील शेट्टी सुखरूपपणे अमरावतीला रवाना झाला.