अमरावती -डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते. मुदतीच्या आत या योजनेतील कर्जफेड केल्यावर शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज आकारले जायचे. आता या योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा तीन लाखांपर्यंत करण्यात ( Interest Free Crop Loan ) आली आहे. त्यामुळे विहित मुदतीच्या आत कर्जफेड केल्यास शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे ( Minister Dadaji Bhuse ) यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील कृषीमंत्र्यांनी केले आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
कृषीमंत्र्यांनी घेतला अमरावती विभागाचा आढावा -दादाजी भुसेंनी आज अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील शेतीचा आढावा घेतला. खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे आणि खत उपलब्ध व्हावेत. यासह शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाकडून योग्य ते पाऊल उचलण्यात यावे. या संदर्भात कृषीमंत्र्यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
दर आठवड्यात घ्यावा कर्जवाटप आढावा - राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नकार देत असल्याच्या अनेक तक्रारी आणि या संदर्भातील काही सूचना आढावा बैठकीत प्राप्त झाल्या. यासंदर्भात आढावा बैठकीनंतर कृषीमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दादाजी भुसे म्हणाले की, विभागीय आयुक्तांसह विभागातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना पिक कर्ज वाटपासंदर्भात दर आठवड्यात आढावा घेण्यासाठी बैठक बोलविण्याचे आदेश दिले आहेत.ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहितीही भुसे यांनी दिली आहे.
यावर्षी भरपूर पाऊस -यावर्षी 99 टक्के पाऊस कोसळणार, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. ही शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा, यासाठी राज्यभरातील शेतीचे योग्य नियोजन करण्यावर आमचा भर आहे. राज्यातील सर्व विभागात खरीप हंगामाची तयारी परिपूर्ण व्हावी, यासाठी मी स्वतः प्रत्येक विभागात जाऊन आढावा घेत असल्याचे भुसे यांनी सांगितले आहे.