अमरावती -जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बळकट करणे, त्यांना आधार देणे यासाठी जिल्हा बँकेचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. मात्र अमरावती जिल्हा बँकेच्या आजी-माजी अध्यक्षांनी गेल्या अकरा वर्षांत पार वाटोळे केले आहे. शेतकऱ्यांपेक्षा स्वतःचे हित जोपासणाऱ्या बँकेच्या आजी-माजी अध्यक्षांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. ज्यांच्याकडे बँकेची जबाबदारी होती त्यांनीच बँकेचा बट्ट्याबोळ केला असल्यामुळे मी मोठ्या पदावर असतानाही जिल्हा बँकेची निवडणूक मला लढवावी लागत आहे, हे खरं तर दुर्दैवी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी दुसरा इलाजच उरला नसल्याने मी निवडणूक रिंगणात असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री आणि राज्य मंत्र्यांच्या वर्चस्वाची लढाई -
अमरावती जिल्हा बँकेची निवडणूक 4 ऑक्टोबर रोजी होत आहे. या निवडणुकी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे समर्थन असणाऱ्या विद्यमान संचालक मंडळाच्या गटविरोधात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या गट उभा ठाकला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक यावेळी पालकमंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या वर्चस्वाची लढाई असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात निर्माण झाले आहे. अकरा वर्षापासून जिल्हा बँकेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे.