अमरावती -अमरावती-नागपूर या दोन्ही शहराला मेट्रो ट्रेनने जोडले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. मेट्रो ट्रेनद्वारे दोन्ही शहराचे अंतर 1 तास 20 मिनिटात जोडले जाणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. १९४५ कोटीच्या निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमीपूजन नितीन गडकरी यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
ही शहरे जोडणार 'मिनी मेट्रो'ने -
पुढील काळात 'मिनी मेट्रो'द्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
अशी असणार 'मेट्रो ट्रेन' -
आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासाइतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भात अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक उत्तम रस्त्यांनी शहरे जोडली जाणार आहेत.
जिल्ह्यातील रस्त्यांचा होणार विकास -
श्रीक्षेत्र बहिरम येथे १ किलोमीटर दुतर्फा सेवा रस्त्यासाठी ३५ कोटी, मोझरी येथे वळण रस्त्यासाठी ११५ कोटी निधीबरोबरच मोर्शी, वरूड, चांदूर बाजार येथील बायपास मार्गासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. मेळघाटातील नियोजित रस्तेविकासाचे काम पूर्ण होण्यासाठी व वनविभागाच्या परवानगी आदी प्रलंबित प्रकिया पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. तसेच अनेक वर्षांपासून रखडलेल्या अकोला ते अमरावती रस्त्याचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -कोरोना आणि महागाईला कंटाळून जीवन संपवू नका - यशोमती ठाकूर