मुंबई - विक्रमी निर्देशांकाची नोंद करून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४१६ अंशाने घसरून ४१,५२८.९१ वर स्थिरावला. रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, एचडीएफसी बँक आणि टीसीएसच्या तिमाही निकालानंतर शेअरची विक्री झाली. त्यामुळे शेअर बाजार बंद होताना निर्देशांक घसरला.
मुंबई शेअर बाजाराने दिवसभरात (इन्ट्रा डे) ४२,२७३.८७ हा विक्रमी निर्देशांक नोंदविला. निफ्टीचा निर्देशांक १२७.८० अंशाने घसरून १२,२२४.५५ वर स्थिरावला. निफ्टीनेही दिवसभरात १२,४३०.५० या विक्रमी निर्देशांकाची नोंद केली होती.
हेही वाचा-असमानतेची प्रचंड दरी! देशातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती वार्षिक अर्थसंकल्पाहून अधिक
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
कोटक महिंद्रा बँकेचे सर्वाधिक ४.७० टक्क्यांनी शेअर घसरले. तिसऱ्या तिमाहीदरम्यान कोटक बँकेच्या अनुत्पादक मालमत्तेत (एनपीए) वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीची वित्तीय कामगिरी कंपन्यांनी मागील आठवडाखेर जाहीर केली आहे. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि टीसीएसचे शेअर ३.०८ टक्क्यांनी घसरले. पॉवरग्रीडचे शेअर सर्वाधिक ३.७५ टक्क्यांनी वधारले. भारती एअरटेल, आयटीएसी, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक आणि एल अँड टीचे शेअरही वधारले आहे.
हेही वाचा-दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाची बैठक; संस्थेच्या संस्थापकाने केले 'हे' आवाहन
बाजार विश्लेषकांच्या माहितीनुसार शेअर बाजाराने विक्रमी निर्देशांक गाठल्यानंतर देशातील गुंतवणुकदारांनी नफा मिळविला आहे. खनिज तेलाचे दर ०.६६ टक्क्यांनी वाढून प्रति लिटर ६५.२८ डॉलरवर पोहोचले आहेत. इराकमधील तणावाची स्थिती आणि लिबियाकडून होणारा खनिज तेलाचा पुरवठा थांबल्याने खनिज तेलाचे दर वाढले आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ७१.३३ वर पोहोचला होता. नवी दिल्लीत सोने प्रति तोळा ४ रुपयांनी वधारून ४०,७४८ रुपयावर पोहोचल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.