नवी दिल्ली- जीएसटी मोबदल्याची कमतरता भरून काढण्यासाठी भाजपाची सत्ता असलेल्या १३ राज्यांनी कर्ज घेण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव मान्य केला आहे. आरबीआयच्या विशेष खिडकी योजनेतून आणि खुल्या बाजारातून या राज्यांकडून कर्ज घेण्यात येणार आहे.
बिहार, ओदिशा, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, मेघालय, गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी कर्ज घेण्याचा केंद्र सरकारच्या पर्याय स्वीकारला आहे. यामधील १२ राज्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ९७ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. तर, केवळ मणिपूर राज्य बाजारातून १.३८ लाख कोटींचे कर्ज घेणार आहे.
भाजपाची सत्ता नसलेल्या सहा राज्यांनी कर्ज घेण्याच्या केद्र सरकारच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, केरळ, दिल्ली, तेलंगणा, छत्तीसगड आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. जीएसटी परिषदेच्या समितीने कर्ज घेण्याच्या दिलेल्या प्रस्तावावर काही राज्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही.