नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. आयएएनएस या वृत्तसंस्थेकडून याबाबतची अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे.
दोन टप्प्यांमध्ये अधिवेशन..
हे अधिवेशन दोन भागांमध्ये होणार आहे. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी असा या अधिवेशनाचा पहिला टप्पा असेल. तर, आठ मार्च ते आठ एप्रिलपर्यंत या अधिवेशनाचा दुसरा टप्पा पार पडेल. तसेच, १७व्या लोकसभेच्या पाचव्या अधिवेशनात ३५ बैठका होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात यातील ११ बैठका पार पडतील. तर, दुसऱ्या टप्प्यात २४ बैठका पार पडतील.
सकाळी ११ वाजता सादर होणार अर्थसंकल्प..
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे २९ जानेवारीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतील. तर, एक फेब्रुवारीला निर्मला सीतारामण या सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर १५ फेब्रुवारीला या अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यात येईल. ज्यामुळे, विविध स्थायी समित्यांना विविध विभागांचे आणि मंत्रालयांचे अहवाल तयार करण्यासाठी आठ मार्चपर्यंतचा वेळ मिळेल.
यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) याच कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची विनंती केली होती. त्याला आता मान्यता मिळाली आहे.
हेही वाचा :काश्मीरमध्ये ३००हून कमी सक्रिय दहशतवादी; सूत्रांची माहिती