नवी दिल्ली - गोपनीयतेबाबत भारत गंभीर आहे. माहितीची गोपनीयतादेखील आमच्या एकतेचा भाग आहे. डाटा साम्राज्यवाद स्वीकारला जाणार नाही, असा इशारा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅप कंपनीचे नाव न घेता दिला आहे. ते कोलंबोमधील (श्रीलंका) कायदे मंत्र्यांच्या कॉमनवेल्थ परिषदेमध्ये बोलत होते.
रविशंकर प्रसाद यांनी डाटा संरक्षणाबाबत भारताची भूमिका कायदे मंत्र्यांच्या कॉमनवेल्थमध्ये स्पष्ट केली. ते म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डाटा हा डिजिटल अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. डाटा अर्थव्यवस्था ही व्यावसायिक आणि रोजगार या दोन्हींसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
विकसित आणि विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात डाटा निर्माण होतो. दोन्ही देशातील डाटा समान महत्त्वाचा आहे. मात्र, केवळ मोठे देशच डाटा प्रक्रिया करण्यासाठी दावा करत आहेत. जर काही कंपन्यांनी डाटामध्ये एकाधिकार करायचा प्रयत्न केला तर ते स्वीकारले जाणार नाही, असा त्यांनी इशारा दिला.