हैदराबाद : संपूर्ण जगाला पडलेला कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत असल्याने या शतकातील सर्वात तीव्र मंदीला सुरुवात झाली आहे.
ओईसीडीच्या एका ताज्या अहवालानुसार कोरोनाचे संपूर्ण जगावर होणारे आर्थिक दुष्परिणाम चिंताजनक आहेत. अहवालानुसार, मागील अनेक शतकांचा विचार करता संपूर्ण मानवी समाजावर ओढवलेले हे सर्वात मोठे आरोग्याचे संकट असून यामुळे मागील शतकातील सर्वात मोठ्या मंदीचा सामना करावा लागणार आहे. या मंदीमुळे लोकांचे आरोग्य आणि नोकऱ्या संकटात आल्याने त्यांचे भविष्य धुसर झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध देशांनी अवलंबलेले निर्बंध शिथिल होत असले तरी संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या छायेमुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा मार्ग अनिश्चित आणि असुरक्षित आहे. कोविडनंतरच्या जगाशी जुळवून घेण्यासाठी आरोग्य सेवेचे बळकटीकरण करणे आणि लोकांना आणि व्यवसायांना मदत करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोविडला आटोक्यात आणण्यासाठी बहुतेक सरकारांनी अवलंबलेल्या लॉकडाऊनच्या उपायांनी विषाणूचा प्रसार रोखण्यात आणि मृत्यूची संख्या नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले असले तरी यामुळे उद्योग क्षेत्र मात्र ठप्प झाले आहे. परिणामी असमानता वाढीस लागली असून शिक्षणात देखील बाधा निर्माण झाली आहे यामुळे भविष्यात आवश्यक असलेला आत्मविश्वास ढासळलेला आहे.
ओईसीडीच्या अंदाजानुसार, संक्रमणाची दुसरी लाट आली नाही तरी जागतिक आर्थिक विकासदर ६ टक्क्यांनी खाली घसरण्याची शक्यता आहे. परिणामी २०१९च्या ५.४ टक्क्यांच्या तुलनेत २०२० मध्ये ओईसीडी देशांमधील बेरोजगारीचा दर ९.२ टक्क्यांवर पोचेल. संक्रमणाचा दुसऱ्यांदा उद्रेक झाला नाही तर लोकांचे राहणीमान खूप मोठ्या प्रमाणात बदलणार नसले तरी २०२१ मध्ये अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे पुढील पाच वर्षांच्या उत्पन्नावर परिणाम होईल.
मात्र, संक्रमणाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागली तर मात्र आर्थिक विकासदर ७.६ टक्क्यांपर्यंत घसरू शकतो. त्याचबरोबर ओईसीडी देशांमध्ये बेरोजगारी दुपटीने वाढून पुढील वर्षी त्यात थोडाफार सुधार होऊ शकतो.
संक्रमणाची दुसरी लाट आली तर, तुलनेने कठोर आणि लांबलचक लॉकडाऊनमुळे युरोपला मोठ्या आर्थिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. परिणामी युरो चलन असलेल्या क्षेत्रात जीडीपी ११.५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेचा परिणाम न जाणवल्यास जीडीपी ९ टक्कयांनी घटण्याचा अंदाज आहे. तर, अमेरिकेतील जीडीपी अनुक्रमे ८.५ किंवा ७.३ टक्के आणि जपानचा जीडीपी ७.३ टक्के किंवा ६ टक्कयांनी घसरण्याचा अंदाज आहे.
ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये आरोग्याची परिस्थिती बिघडलेली असतानाच वस्तूंच्या किंमती वाढल्याने अडचणींमध्ये वाढ झाली आहे. परिणामी दुसरी लाट आली तर जीडीपी दर अनुक्रमे ९. १, १० आणि ८.२ टक्क्यांनी घसरेल. दरम्यान दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची वेळ आली नाहीतर जीडीपी ७. ४, ८ आणि ७. ५ टक्कयांनी घसरण्याचा अंदाज आहे.
दरम्यान ओईसीडी देशांच्या तुलनेत चीन आणि भारतावर होणार परिणाम तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे. कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा उद्रेक झालाच तर चीन आणि भारताचा जीडीपी अनुक्रमे ३.७ आणि ७.३ टक्कयांनी खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अन्यथा सद्यपरिस्थितीनुसार या देशांचा आर्थिक विकासदर २.६ आणि ३.७ टक्कयांनी घसरण्याचा अंदाज आहे.