नवी दिल्ली- टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून काढण्यात आलेल्या सायरस मिस्त्रींना राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद प्राधिकरणाकडून (एनसीएलएटी) मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीएलएटीने सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी पूर्ववत नियुक्ती केली आहे.
टाटा सन्सच्या कार्यकारी चेअरमनपदी एन. चंद्रशेखरन यांची करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचेही एनसीएलएटीने म्हटले आहे. मात्र, सायरस यांची नियुक्ती ही चार आठवड्यानंतर होणार असल्याचे प्राधिकरणाने निकालात म्हटले आहे. ही मुदत टाटा सन्सला याचिका दाखल करण्यासाठी देण्यात आलेली आहे. मिस्त्री कुटुंबाचा टाटा सन्समध्ये सर्वात अधिक १८.४ टक्के हिस्सा आहे.
हेही वाचा-जीएसटी करसंकलन मासिक १.१ लाख कोटी रुपये हवे; वित्तमंत्रालयाकडून उद्दिष्ट निश्चित
काय आहे टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद?
सायरस मिस्त्री यांची टाटा ग्रुपचे सहावे चेअरमन म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांना २४ ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा संचालक मंडळाने पदावरून काढले होते. हे कृत्यदेखील बेकायदेशीर असल्याचे कायदे लवाद प्राधिकरणाने म्हटले आहे.
इन्व्हेस्टमेंट्स आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट्स कॉर्प या दोन कंपन्या सायरस यांच्या मालकीच्या आहेत. त्यांनी मुंबईमध्ये कार्यालय असलेल्या एनसीएलएटीमध्ये टाटा सन्सविरोधात याचिका दाखल केली होती. तसेच दडपशाही आणि गैरव्यवस्थापन होत असल्याचा आरोप याचिकेत केला होता. यापूर्वी प्राधिकरणाने सायरस यांची याचिका रद्द केली होती. टाटा कन्सलन्टन्स सर्व्हिसचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी २० फेब्रुवारी २०१७ ला टाटा सन्सच्या चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
हेही वाचा-म्हणून विमानतळांवर प्रवाशांसाठी बांधण्यात येणार प्रतिक्षागृहे
एनसीएलएटी ही कंपन्यांमधील अंतर्गत वादावर तोडगा काढणारी यंत्रणा आहे.